9 आरोपी निष्पन्न, 4 जेलमध्ये – 20 साक्षीदार, पुराव्यांची जंत्री – आणखी काही जण रडारवर
धाराशिव – समय सारथी
कळंब येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले असुन यात त्यांनी ड्रग्ज खरेदी विक्रीचे रॅकेट कसे सक्रीय होते हे मांडले आहे. दरम्यान नगरसेवक मोहसीन सलीम मिर्झा, लखन गायकवाड यांच्या 5 आरोपीना कोर्टाने जामीन मंजुर केला आहे. 9 जणांच्या संदर्भात जवळपास दीड हजार पानांचे चार्जशीट दाखल केले असुन त्यातील 5 जणांची जामीन झाली आहे तर 4 जण जेलमध्ये आहेत. पोलिस निरीक्षक शकील शेख हे याचा तपास करीत असुन अन्य काही संशयित रडारवर आहेत.
कळंब पोलिसांनी ड्रग्ज कळंब शहरातील निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे, लखन गायकवाड, मोहसीन सलीम मिर्झा व अनिस अमरोद्दीन तांबोळी या 5 जणांसह पुणे जिल्ह्यातील मावळ येथील अक्षय विष्णु रिटे, सुशांत सुरेश सुतार व सागर कृष्णा गराडे या 3 आणि बीड जिल्ह्यातील धारूर येथील रेवण सोपान नाकाते अश्या 9 जणाविरुद्ध कलम 8(क) 22(क) नुसार दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यातील अक्षय रिटे, सुशांत सुतार, अनिस तांबोळी व रेवण नकाते हे 4 वगळता इतर 5 जणांची जामीन झाली आहे.
तपासाअंती पोलिसांनी 20 जणांना साक्षीदार केले असुन ड्रग्ज, गाडी, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. बँक खाते, मोबाईल चॅट हिस्टरी, संभाषण, आर्थिक देवाण घेवाण याच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक मुद्याच्या आधारे तपास केला. पुणे येथुन कळंब येथे ड्रग्ज पुरवठा केला जात असल्याचे तपासात समोर आले, या गुन्ह्यातील काही आरोपीवर यापुर्वी ड्रग्ज तस्करीचे गुन्हे नोंद आहेत. काही आरोपी ड्रग्ज सेवन व पुणे येथुन आणुन कळंब येथे विक्री करीत होते.
आरोपींचे सीडीआर, एसडीआर, बँक स्टेटमेंट व युपीआय व्यवहार, व्हाट्स ऍप कॉल व चॅटच्या आधारे ड्रग्जची खरेदी विक्री साखळी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन तसे आर्थिक व्यवहाराचे पुरावे दोषारोपपत्रात दिले आहेत. या गुन्ह्यात ड्रग्ज पुरवठा करणारे आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे दोषारोप पत्रात नमुद केले आहे. इतर आरोपीना अटक व पुरवणी दोषारोप पत्र सादर करण्याची तरतूद राखून ठेवली आहे.
50 हजार रुपयांच्या व्यक्तीक बॉण्ड, साक्षीदार यांच्यावर दबाव आणू नये, पुराव्याशी छेडछाड करू नये यासह अन्य अटी 5 आरोपीना जामीन देताना घालण्यात आल्या आहेत. 5 आरोपींचा जेलमधुन सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही के मंडे यांनी हे आदेश दिले. ड्रग्जचे कळंब सिंडीकेट हे बीड, पुणे या भागापर्यंत हे सिंडीकेट पसरले असुन त्याला काही स्थानिक नेत्यांचे ‘पाठबळ’ व ‘राजाश्रय’ मिळाला हे वास्तव आहे. धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत सुरुवातीला 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कळंब ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड होते 9 आरोपी निष्पन्न झाले. 2 आरोपीकडुन 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करीत आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.












