तुळजाभवानी मंदिरात अनागोंदी कारभार, भक्तांची हेळसांड – जिल्हाधिकाऱ्यांच्या भुमिकेकडे लक्ष
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कथित व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली ‘घोटाळा’ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मंदिरात काही जणांनी अक्षरशः दर्शनाच्या नावाखाली श्रद्धेचा ‘बाजार’ मांडला असुन मोठे ‘अर्थकारण’ असल्याचा आरोप होत आहे. वशिलेबाजी व इतर मनमानी प्रकाराने मंदीर नेमके कोणाच्या ताब्यात व नियंत्रणात हा प्रश्न समोर आला आहे. भवानी शंकर गेटवर जे व्हीआयपी दर्शन रजिस्टर अर्थात नोंदवही ठेवली आहे त्यात अनेक धक्कादायक प्रकार आहेत. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार कोणती ठोस भुमिका घेत कारवाई करतात हे पाहावे लागेल.
भवानी शंकर प्रवेशद्वारावर जे कथित व्हीआयपी प्रवेश नोंद वही ठेवली आहे ती पाहिली असता अनेक प्रश्न निर्माण होतात. मुळात या रजिस्टरवर मंदीर संस्थान कार्यालयाचा कोणताही शिक्का किंवा अधिकारी याची सही नाही, गरजेनुसार ते संपले की संग्रही नोंद न ठेवता बदलले जाते हे विशेष. या नोंदवहीचा कोणताही फॉरमॅट नसुन दर्शनासाठी कोण सोडले, कोण नेले, भाविक संख्या व वेळ इतकीच ती काहीशी त्रोटक व गोलमाल करणारी माहिती आहे. ज्यांना दर्शन दिले त्यांचे साधे नाव सुद्धा नाही, आधार व ओळखपत्र तर दूरचे.. एकंदरीत तुळजाभवानी मंदीर सुरक्षा रामभरोसे आहे.
आमदार महेश लांडगे, आमदार हेमंत पाटील, आमदार सुनील चव्हाण यांना याचं द्वारातून दर्शन प्रवेश दिल्याचा उल्लेख आहे, ते वागळता इतर नावे न लिहता फक्त आकडा लिहला आहे. काही वेळा तर चक्क तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी यांना सुरक्षा रक्षकांनीच आडवील्याचे कळते, हेच रक्षक मात्र काही ठराविक जणांनी तोंडी आदेश व इशारा केला की पायघड्या घालतात हे वास्तव आहे. खासगी सुरक्षा, एमएसएफ व पोलिस अश्या 3 यंत्रणाचा वावर असुन जाणीवपूर्वक ताळमेळ न ठेवत वादविवाद निर्माण करीत काही जण ‘हीत’ सांभाळत आहेत.
नोंदवहीत ज्यांच्या आदेशाने व्हीआयपी दर्शन देण्यात आले त्यात आदेश देणाऱ्याचे नाव नाही हे विशेष. काही ठिकाणी तर ‘विश्वस्त’ इतकेच लिहले आहे. 2-4 नव्हे तर काही वेळा 10-12 भाविकांना याचं ‘विश्वस्त’ नावावर दर्शनाचा ‘लाभ’ दिला गेला आहे. मंदिर समितीत जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, आमदार व नगराध्यक्ष अश्या 5 जणांचे ‘विश्वस्त’ मंडळ आहे. यातील आदेश नेमका कोणत्या विश्वास्तचा हेच नमुद नाही. कॅमेरे लागले असले तरी खातेवहीचा कारभार याचसाठी जपला जात आहे.
काही ठिकाणी राणादादाचा ‘पीए’ आदेशानुसार असे नमुद आहे मात्र त्याचे नाव लिहले नाही. पीएला अधिकार कोण दिले, ते विश्वस्त कधी झाले व त्याच्या आदेशाने कारभार हाकला जातो का ? असा प्रश्न आहे. विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील नेहमी वास्तव, पुरावा व इतर गप्पा मारतात या नोंदवही व त्यातील पीएबाबत बोलणार का ? हे पाहावे लागेल. एका ठिकाणी ‘विजय सर’ यांच्या आदेशाने 5 जण सोडल्याचे नमुद आहे.
व्हीआयपी नोंदवही नुसार मंदीर व पीआरओ कार्यालयातील काही जण, पोलिस चौकी व विश्वस्त हे कारभारी बनले असुन त्यांनी मनमानी पद्धतीने ‘लाभ’ दिल्याचे दिसते. मंदिराच्या विश्वस्त व काही जणांना व्हीआयपी अर्थात थेट दर्शनाचा दररोजचा ‘कोटा’ संख्या ठरवून दिलेली आहे, हा कोटा कोणत्या विशेषाधिकार व नियमानुसार दिला आहे त्याचं बरोबर विश्वस्त दृष्टीने ‘व्हीआयपी’ कोण याचा खुलासा मंदीर संस्थानने देणे गरजेचे आहे. अनेक वेळा आंध्र, कर्नाटक, तेलंगणासह मुंबई पुण्यातील ‘गर्भ श्रीमंत’ यांच्या नोंदी व्हीआयपी कोट्यात उघड झाल्या आहेत.
सोलापूर येथील तडीपार सराईत गुंड मटका किंग अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे यांच्या तुळजाभवानी गाभारा प्रवेश व फोटोसेशन प्रकरण उघड झाल्यानंतर सुद्धा हा ‘घोळ’ सुरूच होता, त्यातून कोणताही ‘बोध’ घेतलेला दिसत नाही. तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांना जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी विश्वस्त सदस्यत्व रद्द करणेसाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गंगणे यांनी रोडगे यांना सोडले नसल्याची भुमिका घेतली आहे, भवानी शंकर द्वार गेटवरील सर्वाधिक नोंदी ह्या गंगणे यांच्या आदेशाच्या नावाने आहेत, त्यावर गंगणे काय बोलणार व जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात हे पाहावे लागेल.
जिल्हाधिकारी हे दुष्काळ, उपाययोजना व नवरात्र धार्मिक कार्यक्रम आणि नियोजनासह अन्य बाबीत वेगवेगळी भुमिका सक्षमपणे पाहत असले तरी नवरात्र व्यवस्थापन रचनेत ठाण मांडून बसलेल्या काही जणांची जुनी सवय व खोड गेलेली नाही, त्यांची अर्थपूर्ण युती व लॉबिंग असल्याचा आरोप होत आहे. त्याचंमुळे स्वतंत्र कार्यालय, तहसीलदार व इतर आस्थापना देऊनही स्तिथी काही सुधारलेली दिसत नाही.











