गुन्हा नोंद – बेंबळी घोटाळा प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकाने केले अपहार, आरोपी फरार
तक्रार,चौकशी,वसुली,राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या घडामोडीने घोटाळा गाजला
धाराशिव – समय सारथी
बहुचर्चित बेंबळी ग्रामपंचायत येथे झालेल्या अपहार प्रकरणात सरपंच व ग्रामसेवक विरोधात अखेर शनिवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. तक्रार,चौकशी,कागदपत्रे गायब,प्रशासकीय दिरंगाई,अपहार वसुली,राजकीय आरोप प्रत्यारोप व घडामोडीने घोटाळा चांगलाच गाजला. विस्तार अधिकारी बच्चेसिंह देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच वंदना नवनाथ कांबळे, ग्रामसेवक ए व्ही आगळे याविरोधात कलम 420, 406,409, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बच्चेसाहेब देशमुख यांना भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी फोनवरून धमकी दिल्याच्या तक्रारीनंतर भाजपचा यात राजकीय हस्तक्षेप दबावतंत्र असल्याचा आरोप शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी करीत भाजप पार्टी विथ करप्शन अशी टीका केली.
बेंबळी येथील घोटाळ्याप्रकरणी सरपंच वंदना नवनाथ कांबळे, ग्रामसेवक ए व्ही आगळे यांच्यासह यांत्रिकी विभागाचे शाखा अभियंता बी बी शिंदे यांना रक्कम वसुलीची अंतीम नोटीस देऊन संधी दिली होती त्यातील शिंदे यांनी अपहारातील 2 लाख 39 हजार सरकारच्या खात्यात भरले आहेत. कांबळे यांच्याकडे 12 लाख 93 हजार, आगळे यांचेकडे 11 लाख 53 हजार रक्कम न भरल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असुन सहायक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे तपास करीत आहेत.
15 वा वित्त आयोग, अंगणवाडी व शाळेसाठी साहित्य खरेदी, ग्रामपंचायतीसाठी साहित्य खरेदी, गावातील कुटुंबाना कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिन, कीटकनाशके फवारणी यांसह अन्य बाबीत घोटाळा केल्याचे चौकशी अहवालात उघड झाले.या घोटाळ्याची तक्रार बेंबळी येथील अभयसिंह गावडे, नवाब पठाण, आकाश मुगळे यासह ग्रामपंचायत सदस्यांनी अपहार व घोटाळ्याची तक्रार केली होती तर शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.