सांगली – समय सारथी
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांनी उरूण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम प्रकरणी सुनावणी अंती अपात्र ठरवले. या निर्णयामुळे माजी मंत्री जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. 30 पैकी 22 नगरसेवक पवार गटाचे असुन 8 महायुतीचे आहेत. अपात्रतेमुळे राजकीय समीकरण बदलणार आहे.
नगराध्यक्ष मलगुंडे यांनी भूमापन क्र.8/1 अ, 8/1, अ/12, 8/1/अ/13, 8/1ब, 8/2 व 11 मिळकतीमध्ये पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम कलम 44 (1)(इ) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरविण्यात आले आहे.मलगुंडे यांच्या विरोधात शिवसेनेचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष जयकर उर्फ घनश्याम दिनकर जाधव यांनी तक्रार दाखल केली होती.
मलगुंडे यांनी त्यांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याने आणि त्यांनी बिगरशेती प्रमाणपत्र न घेता बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यावे असा तक्रार अर्ज जिल्हाधिकार्यांकडे दाखल केला होता. या तक्रार अर्जात जाधव यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, विजय संभाजी मलगुंडे व सुनिल संभाजी मलगुंडे यांच्या मालकीची ही इमारत पेठ-सांगली रस्त्याला लागून आहे.
या इमारतीचे बांधकाम करताना कब्जेपट्टी करून दिलेल्या जागेत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करायचे नाही. जरूर तर सहहिस्सेदारांची संमती घेणे आवश्यक होते. जमीन महसूल नियमानुसार आवश्यक ती मंजूरी संबंधित खात्याकडून घेणे आवश्यक होते. अशा अटी असताना त्यांनी अतिक्रमण करून इमारत बांधली आहे.या आदेशाविरुद्ध राज्य शासनाकडे आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत अपील दाखल करण्याची तरतूदही आदेशात नमूद करण्यात आली आहे.











