जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांचा पुढाकार , पडिक जागेत श्रमदानातून वृक्ष लागवड व संगोपन
उस्मानाबाद – समय सारथी
‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे’ या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाला साजेसे काम जिल्हा प्रशासन व वनविभागाने करून दाखवले आहे. गतवर्षी उस्मानाबाद शहरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या पाठीमागील पडीक जागेत जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघटना व नागरिकांच्या श्रमदानातून ८५० झाडांची लागवड करण्यात आली होती. तर वनविभागाकडून घनवन योजनेअंतर्गत ९० हजार घनदाट वृक्षाची लागवड करण्यात आली होती. वर्षभर या झाडांचे योग्य संगोपण करण्यात आले. सध्यस्थितीत याठिकाणी ९१ हजार झाडे बहरल्याने अवघा परिसर हिरवाईने नटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
उस्मानाबाद शहरातील शासकीय तंत्रनिकेतच्या पाठीमागील जागेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या सहकार्याने ‘आपलं उस्मानाबाद हरित उस्मानाबाद’ हे महाश्रमदान शिबीर राबविण्यात आले होते. तसेच वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले होते. तर जूनमध्ये खोदलेल्या या खड्डयामध्ये ८५० रोपांची लागवड करण्यात आली होती. तसेच वर्षभर श्रमदानातून या रोपांचे योग्य संगोपण करण्यात आले. सध्यस्थितीत याठिकाणच्या रोपांची वाढ ही ५ फुटापर्यंत झाली आहे. तसेच याठिकाणी वन विभागामार्फत घनवन योजनेअंतर्गत मियावाकी संकल्पनेतून ९० हजार घनदाट लागवड करण्यात आली. विशेषत: महाश्रमदानातून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. उस्मानाबाद शहरातील शासकीय तंत्रनिकेतच्या पाठीमागील पडीक जागेत तब्बल ९१ हजार वृक्ष ५ फुटापर्यंत वाढली असून हिरवाईने नटल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे एकेकाळी भकास दिसणारा हा परिसर आता वनराईने बहरला आहे. जुलै महिन्यात या मोहिमेला 1 वर्ष होत असून अवघ्या वर्षभरात परिसर हिरवा झाला आहे. या वृक्ष लागवड मोहिमेमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढण्यास सुध्दा मोलाचा हातभार लागणार आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वत: श्रमदान करुन खड्डे घेण्यापासून ते वर्षभर या झाडाच्या संगोपनाकडे वैयक्तिक लक्ष दिले. त्यासाठी त्यांनी सायकल रॅली काढली व वेळोवेळी या भागात स्वत: जाऊन पाहणी करुन आढावा घेतला. त्याचे फलीत आज दिसत आहे.
जिल्हाभर घनवन विकसित करण्याचा संकल्प जिल्हाधिकारी यांनी केला आहे. शासकीय तंत्रनिकेतन भागातील या प्रकारचा उस्मानाबाद जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग करण्यात आला होता. तो अत्यंत यशस्वी ठरला आहे. त्यामुळे यावर्षीदेखील जिल्हाभर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक तालुक्यातून दोन ठिकाणी घनवन विकसित करण्यात येणार आहे. सदर घन वन हे शहरासाठी ऑक्सीजन पार्क म्हणून विकसित होत असून याचा लाभ पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी होणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली.