महावितरण अधिकाऱ्याचा मुजोरपणा – ट्रान्सफॉर्मर बसवीण्याचा निधी 3 वर्षांपासुन अखर्चित
1 हजार 117 कामासाठी 53 कोटींचा निधी मात्र माहिती देण्यास टाळाटाळ
शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंद करा – आमदार सुरेश धस
धाराशिव – समय सारथी
शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतात ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीतुन 3 वर्षात 53 कोटी रुपयांचा निधी दिला, त्यातून 1 हजार 117 कामे होणे अपेक्षित होते मात्र हा निधी सलग तीन वर्ष अखर्चित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी यांनी 2 वेळा स्मरणपत्र काढूनही निधी खर्चाची व झालेल्या कामांची माहिती दिली जात नाही त्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांचा मुजोरपणा पाहायला मिळत आहे. गेली 3 वर्षांपासून अखर्चित ठेवला आहे त्यामुळे विधानपरिषदेचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अखर्चित निधी प्रकरणी आमदार धस यांनी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थितीत केला आहे त्यामुळे हे प्रकरण अधिकांऱ्याच्या चांगलेच अंगलट येणार आहे.
वीज न मिळाल्याने पिके करपली, शेती करता आली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला व अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्ती करणाऱ्या महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता यांच्याकडुन तात्काळ खुलासा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मागितला आहे मात्र याची माहिती महावितरणकडुन दिली जात नसल्याने त्यांचा मुजोरपणा दिसून येत आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये सन 2021, 2022 व 2023 ते आतापर्यंत जिल्हा विकास निधीमधुन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र महावितरणने निधी देऊनही ते बसवले नाहीत. 2020-21 या वर्षात 425 कामासाठी 15 कोटी, 2021-22 या वर्षात 372 कामासाठी 18 कोटी व चालु वर्षात 2022-23 मध्ये 320 कामासाठी 19 कोटी असे 3 वर्षात 53 कोटी निधी दिला आहे मात्र त्याची माहिती दिली जात नाही. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे.