तहसीलदार मृणाल जाधवांच्या पुढाकारातुन शेतकऱ्यांच्या संमतीने रस्ता
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील रुईभर ते बरमगाव बुद्रुक या दरम्यानचा महत्त्वाचा शेत रस्ता गेल्या तब्बल चार दशकांपासून विविध अडथळे, अतिक्रमण व वादग्रस्त परिस्थितीमुळे बंद अवस्थेत होता. परिणामी शेकडो शेतकऱ्यांना आपल्या शेतीपर्यंत जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत वेळोवेळी महसूल प्रशासनाकडे अर्ज, निवेदने व तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून धाराशिव तालुक्याच्या तहसीलदार मृणाल जाधव यांनी महसूल अभिलेख, अधिकृत नकाशे तसेच लागू कायदेशीर तरतुदींच्या आधारे सर्व संबंधित पक्षकारांना विश्वासात घेत शांततेच्या मार्गाने तोडगा काढला. कोणत्याही प्रकारचा दबाव अथवा संघर्ष न करता सर्व शेतकऱ्यांच्या परस्पर सहमतीने हा शेत रस्ता कायमस्वरूपी खुला करण्यात आला आहे.
या लोकहितकारी कार्यात स्थानिक शेतकरी सुरेश कलाल, बाळासाहेब वडवले, आबा जगताप, पोपट चव्हाण, जायहरी चव्हाण, संदिपान बाबा वडवले, शिवाजी वडवले, काकासाहेब चव्हाण यांनी प्रशासनास सक्रिय सहकार्य केले. त्यांच्या सकारात्मक सहभागामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अत्यंत सुकरतेने मार्गी लागला. या रस्त्याच्या खुल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांची दळणवळणाची सोय सुलभ झाली असून शेतीमालाची वाहतूक अधिक जलद व कमी खर्चात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व आर्थिक खर्च कमी होऊन त्यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ होण्यास मदत होणार आहे. परिणामी परिसरातील कृषी विकासाला चालना मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत नायब तहसीलदार विशाखा बलकवडे , मंडळ अधिकारी मस्के तसेच रुईभर गावचे तलाठी पाचकुडे यांनी नियोजनबद्ध व कायदेशीर पद्धतीने कार्यवाही करत महत्त्वाची भूमिका बजावली. महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे हे उत्तम उदाहरण ठरत असून नागरिकांमध्ये प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाबद्दल सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत.












