कोरोना रुग्णाच्या मृत्यूच्या आकड्यांचा खेळ ? मृत्यूनंतर तपासणीत कोरोनाबाधीत रुग्ण निगेटिव्ह
नातेवाईकांनी आक्षेप घेताच अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा मयत पॉझिटिव्ह
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले चौकशीचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच रुग्ण संख्या वाढत आहे त्याच बरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे . वेळीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल न झाल्याने अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत जात असून परिणामी त्यांचा मृत्यू होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी तब्बल १९ मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर स्मशानभूमीची गहिवरली व त्यांनतर मृत्यूच्या आकड्यांचा विषय समोर आला.
आज १६ एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलेल्या अजब प्रकारामुळे कोरोना रुग्णाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा खेळ सुरु आहे का ? हा प्रश्न विचारला जात आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील अंगद कोंडीबा जाधव या ५५ वर्षीय रुग्णाला ११ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी साडे सात वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी त्याना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले तर एचआरसीटी मध्ये त्यांचा स्कोर २५ पैकी २३ आला त्यामुळे आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले त्यानंतर आज १६ एप्रिल रोजी त्यांचे सकाळी निधन झाले. निधन झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात १६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.०३ वाजता त्यांची ( मृतदेहाची ) रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली त्यावेळी ती निगेटिव्ह आली असे दाखविण्यात आले व मृतदेह नातेवाईक यांना नेण्यास सांगण्यात आले त्यावेळी नातेवाइकानी अनेक खोचक प्रश्न विचारले नंतर पुन्हा मृतदेहाची सकाळी १०.३८ वाजता रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली त्यावेळी ती अवघ्या अर्ध्या तासात पॉझिटिव्ह आली. या सर्व चाचणी याची नोंद रुग्णाच्या केस ( तपासणी ) पेपरवर करण्यात आली आहे. मृत्यूनंतर तपासणीत कोरोनाबाधीत रुग्ण सुरुवातीला निगेटिव्ह व नंतर पॉझिटिव्ह आल्याने मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी तर ही उठाठेव नसेल ना हा प्रश्न समोर आला आहे.
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू व उस्मानाबाद नगर परिषदेने केलेले अंत्यसंस्कार याचाही आकडा कुठेच जुळत नसल्याने संशयाची सुई जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जात आहे.
दरम्यान उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बावी येथील रुग्णाच्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असून दर आठवड्याला मृत रुग्णाचे डेथ ऑडिट ( कारणांचा शोध व उहापोह ) करण्यास सांगितले असून त्यातून अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत जेणेकरून उपचार पद्धतीत आवश्यक ते बदल केले जाणार आहेत, हि बाब चांगली आहे.
उस्मानाबादसह जगात कोरोनाने हाहाकार माजला आहे. पहिल्यांदाच अश्या प्रकारची आरोग्य आणीबाणी आल्याने अनेक वैदकीय असुविधा आहेत मात्र उपलब्ध साधन सामुग्री मनुष्यबळावर आरोग्य व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कोणीही सुज्ञ नागरिक, लोकप्रतिनिधी प्रशासनाला याबाबत दोषी ठरवत किंवा टीका करीत नसताना, आरोग्य विभाग मृत्यूचे आकडे लपण्यासाठी अशी उठाठेव व कसरत का व कोणाच्या आदेशाने करत आहे हा प्रश्न विचारला जात आहे. मयत रुग्नाला निगेटिव्ह दाखवून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असतानाही असा प्रयत्न केला जात आहे मात्र तो आज नातेवाईकांच्या जागरूकतेने फोल ठरला. आता या प्रकारचे खापर रॅपिड अँटीजन किटच्या कार्यक्षमतेवर फुटू नये म्हणजे झाले.