धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पुन्हा वाढता प्रभाव पहायला मिळत असुन जिल्हाध्यक्ष डॉ प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती पक्षाला व कार्यकर्ते यांना उमेद द्यायला टर्निंग पॉईंट ठरली आहे. योग्य वेळी भाकरी फिरवणारे शरद पवार यांनी जिल्हाध्यक्षपदी योग्य वेळी केलेला बदल हा महत्त्वाचा राजकीय संकेत ठरला असुन त्याचे फलित नगर परिषद निवडणुकीत दिसुन आले आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ प्रतापसिंह पाटील यांची पंधरा दिवसांपूर्वी निवड करण्यात आली. धाराशिव हा परंपरेने शरदचंद्र पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा जिल्हा मानला जातो. अनेक मोठ्या प्रसंगी धाराशिव जिल्ह्याने शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्या विचारांशी बांधिलकी अधोरेखित केली आहे.
नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीनंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत उतरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.धाराशिव, नळदुर्ग, उमरगा, कळंब या सर्वच ठिकाणी तगडी लढत देत आहे.
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत 31 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने आपले उमेदवार देत तगडे आव्हान उभे केले आहे. नळदुर्ग नगरपरिषदेत 12 नगरसेवकांसह एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उभा केला आहे. उमरगा नगरपरिषदेत आठ ठिकाणी उमेदवार उभे केलेत. कळंब नगरपरिषद: राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येत स्थानिक आघाडी केली असून दहा ठिकाणी सक्षम उमेदवार उतरवले आहेत.तुळजापूर नगरपरिषद येथे फक्त महाविकास आघाडी स्वरूपात तीन ठिकाणी उमेदवार दिले आहेत.
एकंदरीत पाहता तुळजापूर सोडता जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने जोरदार उपस्थिती दाखवत तगडे आव्हान निर्माण केले आहे. राजकीय वर्तुळात शरद पवार हे योग्य वेळी योग्य पावले उचलणारे नेते म्हणून ओळखले जातात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी जिल्हाध्यक्षपदात केलेला बदल हा त्याच ‘भाकरी फिरवण्याचा’ भाग असल्याची चर्चा राजकीय जाणकार करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात एकूण 64 ठिकाणी उमेदवार तर दोन ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देत राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपली ताकद ठळकपणे दाखवून दिली आहे. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आजही जिल्ह्यात प्रभावी असल्याचे या घडामोडींमधून दिसून येते. डॉ पाटील कुटुंबीयांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद काहीशी कमी झाल्याचे दिसत होते. परंतु प्रतापसिंह पाटील यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी पुन्हा एकदा उभारी घेताना आणि संघटनाला चैतन्य आलेले दिसून येत आहे.












