धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाची महायुती झाल्याची घोषणा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबई येथून केली. निधी वाटपाच्या वादात व सत्तेच्या समीकरणात काही मुद्यावर ‘वाटणी’ करून नेत्यांनी आपआपसात मिटवून घेतले.
विकासाचा सिझनल कळवळा दाखवत जनतेला गृहीत धरल्याचा हा ‘नुरा कुस्तीचा’ ‘सामना’ या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाला आहे. आता हेच महायुतीतील 2 नेते सत्तेसाठी पुन्हा जनतेच्या दरबारात त्याचं रखडलेल्या अर्थात त्यांनीच अडवलेल्या विकासाच्या मुद्यावर त्याच दमाने मतांचा ‘जोगवा’ एकदिलाने मागणार आहेत.
दिशा स्पष्ट, ठाम निर्धार.. असे म्हणत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईतील बैठकीचे फोटो आवर्जून सोशल मीडियावर पोस्ट करीत महायुती झाल्याचे जाहीर केले, त्यानंतर मुंबई येथे ठाण मांडून युतीची घोषणा पालकमंत्री यांच्या मुखातून करून घेतली, पालकमंत्री यांनी केलेल्या घोषणेला धाराशिव येथील काही स्थानिक नेत्यांचा विरोध असुन अनेकांना विश्वासात न घेता वरिष्ठच्या दबावापोटी हे लादले जात असल्याचा आरोप शिवसैनिक करीत आहेत, तर दुसरीकडे आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी ऐकला चलो रे चा ठाम निर्धार व नारा दिला आहे.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आणि नितीन काळे असे शिष्ट मंडळ भुम परंडा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या भेटीला पुणे येथे पाठवले तर दुसरीकडे पालकमंत्री यांची थेट भेट घेत निधी वाटपासह जागा वाटपाचे सगळे मतभेद दुर केले.
140 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत घोळ आहे, सरकारचे आर्थिक नुकसान होत असल्याने फेरनिविदा काढावी अशी लेखी तक्रार पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. कामाच्या कार्यादेशाला त्यांनी स्थगिती आणली मात्र निवडणुका लागताच सुर मावळलेला दिसत आहे. 140 कोटीच्या प्रकरणात ठेकेदार अजमेरा हे सरकार विरोधात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात गेले असुन तिथे त्याची सुनावणी सुरु आहे. तिथे सरकार ठोस बाजु मांडणार का? हे पाहावे लागेल.
जिल्हा नियोजन समितीच्या कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार आमदार राणाजगजीतसिह पाटील यांनी केली त्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ विभागाने स्थगिती दिली, जिल्हाधिकारी यांनी शिफारस केलेली 22 कोटीची कामे वगळता इतर कामाची गरज, आवश्यकता तपासली जाणार आहे.
आमदार राणा यांनी नियोजन समिती तर पालकमंत्री हानी 140 कोटींची तक्रार करून राजकीय हिशोब बरोबर केला, त्यानंतर राजकीय सोयीने सत्तेसाठी युतीची घोषणा केली असली तरी विकासाच्या गोंडस नावाखाली धाराशिवची जनता यात नाहक भरडली गेली हे मात्र सत्य..












