धाराशिव – समय सारथी
140 कोटी रुपयांच्या रस्ते कामाला राज्य सरकारने 28 ऑक्टोबर रोजी स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने ‘स्थगिती’ देण्याच्या अगोदरच काम सुरु केल्याचे दाखवण्यासाठी अजमेरा या ठेकेदाराने केलेला एक कागदोपत्री ‘घोळ’ समोर आला आहे. रस्ते कामाच्या ठिकाणाचा सर्वे करून त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरु केल्याचे अजमेरा यांनी दाखवले आहे. अधिकारी यांच्या उपस्थितीतीत फोटोसेशन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आल्याची ही सगळी ‘मॅरेथॉन’ प्रक्रिया अवघ्या 7 मिनिटात झाली. 7 मिनिटात सत्तेचा खेळ… असे काहीसे आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 ऑक्टोबरला धाराशिव मुख्याधिकारी नीता अंधारे यांना सकाळी 11.57 वाजता फोन करून स्थगितीचे निर्देश दिले, त्यानुसार त्यांनी ‘वेळ’ नमुद करून ठेकेदार अजमेरा यांना पुढील आदेशापर्यंत कामास सुरुवात करू नये असे लेखी पत्र दिले मात्र त्या पूर्वीच काम सुरु केल्याचे अजमेरा यांनी दाखवले, त्यांनी 28 ऑक्टोबरचे काही जीपीएस फोटो जोडले, त्यानुसार त्यांनी तहसीलदार घर ते अजमेरा घर व ताज चौक ते सिव्हिल हॉस्पिटल या 2 रोडचे काम सुरु केल्याचे दाखवले. अख्खे शहर खड्यात असताना हे दोन्ही रोड अजमेरा यांच्या घरासमोरील निवडल्याने ते या रस्ते योजनेचे खरे ‘नशीबवान’ व पहिले ‘लाभार्थी’ ठरले.
नगर परिषद प्रतिनिधी असलेल्या काही अधिकारी यांना सोबत घेऊन 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.42 ते 11.49 या 7 मिनिटांच्या काळात अजमेरा ठेकेदार यांनी या 2 रस्त्यावरील 6 ठिकाणी जीपीएस फोटो काढले, त्यावर तारीख, वेळ, दिशा नमुद असुन ते मुख्याधिकारी यांच्या पत्रासोबत जोडले आहेत. सर्वे फोटोसेशन करीत कामाला सुरुवात केली मात्र त्या ठिकाणी आता काम सुरु केले/ झाले याच्या कोणत्याही ‘खुणा’ दिसत नाहीत. कदाचित रस्त्यातील खड्यात त्या खुणा शोधण्यासाठी तज्ज्ञ ‘समिती’ नेमावी लागेल.
28 ऑक्टोबचे सगळे फोटो, प्रक्रिया संशयास्पद आहे, त्या दिवशी व ऑक्टोबर महिन्यातील अधिकारी, ठेकेदार यांच्यासह राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासून चौकशीची मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी केली आहे. स्थगिती अगोदर काम सुरु केले हे कोर्टात दाखवण्यासाठी केलेला ‘खटाटोप’ असाही आरोप त्यांनी केला असुन प्रसंगी या निविदा बाबत उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा साळुंके यांनी दिला आहे.
अवघ्या 7 मिनिटात हे करण्याची ‘कला’ व ‘नियोजन कौशल्य’ जर ठेकेदार अजमेरा यांना ‘अवगत’ असेल तर ते पुरस्कारास पात्र ठरतात. त्यांचा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यथोचित ‘नागरी सत्कार’ करायला हवा अशी मागणी होत आहे. अजमेरा यांना काम दिल्यास 59 रस्ते कामाच्या दर्जा व गुणवत्तेची जबाबदारी आमदार पाटील घेतली असुन ते या योजनेत एक प्रकारे ‘गुणवत्ता नियंत्रण’ अधिकारी ही दुहेरी भुमिका पार पाडणार आहेत.
फोटोसेशन व प्रक्रियेवरील आक्षेप – 28 सप्टेंबर मुहूर्त का ? वेळेचा खेळ
1) ठेकेदार अजमेरा यांनी GPS व With out GPS फोटो जोडले आहेत त्यानुसार फोटोमधील फ्रेम एक सारखी आहे, हे फोटो edited असल्याचा आरोप होत आहे. एक फोटो काढला की दुसरा फोटो काढताना फ्रेम, हालचाली व मागील दृश्य बदलले मात्र इथे सगळे जणू काही ‘स्तब्ध’ झाले आहे.
2) सकाळी 11.42 ते 11.49 अश्या 7 मिनिटात GPS लोकेशन असलेले फोटो काढले आहेत. 2 रस्ते व ठिकाण अंतर पाहिले तरी सहज पायी चालत जायला किमान 4-5 मिनिट लागतात, यांनी 7 मिनिटात सर्वे व काम सुरु केले.
3) 16 ऑक्टोबरला मुख्याधिकारी अंधारे यांनी कार्यादेश दिले त्यानंतर 28 ऑक्टोबरला म्हणजे 12 दिवसांनी काम सुरु करण्यासाठी मुहूर्त गाठला. अजमेरा यांनी दाखल केलेल्या फोटोनुसार एका फोटोत 20-25 टोपली खडी व एक जेसीबी दिसत आहे, पर्याप्त यंत्रणा नसताना काम सुरु केल्याचे दाखवले.












