यात्रा अनुदान अपुरे असल्याचा दावा – प्रस्ताव शासन दरबारी रखडला – 10 कोटींचा सांस्कृतिक महोत्सव
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असुन यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. नवरात्र उत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा देण्यासाठी वस्तु किंवा इतर स्वरूपात काही ठेकेदार व भाविकांकडुन सेवा घेतली जाणार आहे. नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारकडुन यात्रा अनुदान येत असतानाही हा ‘उद्योग’ सुरु आहे.
‘तुळजापूर नवरात्र उत्सव’ची संकल्पना मांडून ती राबवण्यासाठी 25 लाख ते 1 कोटी रुपया पर्यंतचे असे 7 कोटी रुपयांचे ब्रँड स्पॉन्सर शोध सुरु आहे. जिल्ह्यातील ठेकेदार यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जात असुन त्याला ते वैतागले आहेत तर काही शासकीय अधिकारी यांना आदेश स्वरूपात नियोजन करा असे म्हणत ‘सक्षम’ अधिकाऱ्यांचे ‘गट’ नेमून ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. तुळजापूर व तुळजाभवानी देवीच्या नावाखाली होणारे हे आर्थिक ‘बाजारीकरण’ वेळीच थांबवणे गरजेचे आहे.
काही ठेकेदार, कंपन्या ‘मदत’ स्वरूपात पैसे व वस्तु देण्यास तयार आहेत मात्र त्यांनी प्रशासनाच्या ‘कृपा’ आशीर्वादाची ‘अट’ टाकली आहे. काही दिले तर दुर्लक्ष व पाठबळ दया असे असुन सीएसआरच्या ‘गोंडस’ नावाखाली हे झाकण्याचे प्रकार आहे. मात्र सीएसआर कुठे, किती व कशासाठी द्यावा याला नियमावली आहे, ती इथे लागु पडत नाही.
नवरात्र उत्सव व्हावा यासाठी राज्य सरकार दरवर्षी नगर परिषदेला ‘यात्रा अनुदान’ देते त्यातून बॅरीगेटिंग, पाणी, सीसीटीव्ही इतर व्यवस्था होणे अपेक्षित आहे, त्यासाठी प्रत्येक बाबीला किती रुपये लागणार याचा मागणी प्रस्ताव दिला जातो. कामाचे स्वरूप, काय करायचे याचे नियोजन व मागणी केली जाते. यात्रा अनुदान अपुरे पडत असल्याचे सांगत भाविक व ठेकेदार यांच्या पुढे हात पसरले जात आहेत. यावर्षी 3 कोटी 75 लाख अनुदान आले आहे मात्र खर्च 8 कोटी आहे, मागणीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठपुरावा करूनही ‘लाल फितीत’ अडकला आहे म्हणून ही ‘वेळ’ आमच्यावर आली असे काही अधिकारी सांगत आहेत.
भविक, ठेकेदार यांनी काय दिले, किती दिले यांची नोंद कोण ठेवून सगळं सार्वजनिक जाहीर करणार ? की पुन्हा त्याच कामाच्या नावाने ‘यात्रा अनुदानचा’ निधी वापरून बिले काढली जाणार ? याबाबत अनेक प्रश्न आहेत. यापुर्वी तुळजापूर नगर परिषदेचा यात्रा अनुदान घोटाळा राज्यभर गाजला होता. त्याचीच आता पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तुळजापूर नवरात्र उत्सव ही संकल्पना मंदीर संस्थानच्या माध्यमातून मांडून त्यासाठी 7 कोटी रुपयांच्या स्पॉन्सरशिप जमा करण्याचे टार्गेट आहे. यासाठी कॉर्पोरेट ‘संकल्पना’ मांडून 14 पानाचे ‘पीपीटी’ प्रस्ताव तयार केला आहे. 12 दिवसात 9 कार्यक्रम आणि त्यात मिळणारे लाभ व सेवा नमूद आहेत. स्पॉन्सर/ दात्याला 50 वृत्तपत्र, 15 न्यूज चॅनेल, ऑनलाईन पोर्टल माध्यमातून प्रसिद्धी देण्याची ‘जबाबदारी’ मंदीर संस्थानने उचलली आहे. किती स्पॉन्सर मिळाले हे अद्याप समोर आले नाही.
सीएसआर व इतर स्पॉन्सरशिप मधून पैसे अधिकाऱ्यामार्फत गोळा करायचे व त्या पैसातून कार्यक्रमात ‘करून दाखवलं’ या आवेशाने मिरवायचे असेच काहीसे सुरु आहे. यात्रा अनुदान निधी मागणी प्रस्ताव शासन दरबारी मंजुर करण्यासाठी योग्य पाठपुरावा झाल्यास ही ‘उठाठेव’ बंद होऊ शकते. हा ‘पायंडा’ रुजू झाल्यास नवरात्र हा काही जणांसाठी वसुलीसाठी ‘सोहळा’ व इतर बाबीसाठी बदनाम होऊ शकतो.
मदत घेऊन मदत करणे हे एक प्रकारे भ्रष्टाचाराला अधिकृत ‘मान्यता’ दिल्यासारखेच आहे. ठेकेदार यांच्याकडुन आज पैसे मागायचे उद्या त्यांच्यावर चुकले तर कारवाई करता येईना ना बोलता येईना. साहेबापुढे झुकुन ठेकेदारांना झुकवले तर ताठ मानेने वागता येईना अशी चर्चा अधिकाऱ्यांच्या गोटात आहे. तर साहेबांनीचं आता ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे मग काय गाडी ‘सुसाट’ असे म्हणत काही जनानी मेहरनजर मिळावी म्हणून मोहिम फत्ते करण्याचा विडा उचलला आहे. स्वतःचे विशेष प्रशासकीय ‘कौशल्य’ वापरून चांगला परफॉर्मन्स व यातून थोडेफार ‘स्वकल्याणाच्या’ स्वार्थ परमार्थ हेतुने ‘पूर्णवेळ’ कामात रमले आहेत.