कोरोना – लहान मुलांच्या उपचारासाठी श्रीयश हॉस्पिटलमध्ये बेड राखीव
दुसऱ्या लाटेत 11.72 टक्के लहान बालके पॉझिटिव्ह – टास्क फोर्स स्थापन
घाबरू नका,काळजी घेऊन वेळीच उपचार करा – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची व दुसऱ्या लाटेत अनेक बालके कोरोनाग्रस्त सापडल्याने प्रशासनाने लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. उस्मानाबाद येथे बाल रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असुन शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ सुधीर मुळे यांच्या श्रीयश हॉस्पिटलमधील 25 पैकी 19 बेड हे कोविड बाल रुग्णांसाठी आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहे.डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल नंतर आता बालकांसाठी डेडीकेटेड चिलड्रन हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहेत.जिल्हा शक्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे हे या बाल रुग्णालयाचे सनियंत्रण अधिकारी असणार आहेत. कोरोना संसर्गात लहान मुलांना कोरोना होतो म्हणून घाबरून जाऊ नका, योग्य काळजी घेऊन वेळीच लक्षणे दिसल्यावर डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होते तर दुसऱ्या लाटेत हे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यादृष्टीने खासगी रुग्णालयात लहान मुलांना उपचारासाठी परवानगी देण्याच्या अनुषंगाने उस्मानाबाद शहरातील डॉ सुधीर मुळे यांच्या श्रीयश रुग्णालय येथील 25 पैकी 19 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत, या रुग्णालयाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागु नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे 2021 या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात 38 हजार 42 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्यात 0 ते 18 वयोगटातील 4 हजार 458 रुग्ण होते. फेब्रुवारी महिन्यात 394 रुग्ण सापडले त्यात 44 हे 18 वर्षाखालील बालके होती. मार्च महिन्यात 3 हजार 391 पैकी 351, एप्रिल महिन्यात 18 हजार 36 पैकी 2 हजार 124 बालके, मे महिन्यात 16 हजार 221 पैकी 1 हजार 939 बालके कोरोना ग्रस्त सापडली. कोरोनाची दुसरी लाट ही लहान बालकांसाठी सुद्धा घातक ठरली फेब्रुवारी ते मे या 4 महिन्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11.71 टक्के लहान बालकांचा समावेश होता.
कोरोना विषाणूंची लागण लहान नवजात बालकांसह 18 वर्षाखालील बालकांना होत आहे त्यामुळे तो संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यातील शिशुंसाठी वार्मर (उबदार) व लहान बालकांसाठी स्वतंत्र कोविड केअर रुग्णालय जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद, उमरगा व तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात तयार करण्यात येत आहेत. गरज भासल्यास खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. इस्माईल मुल्ला यांनी दिली.
उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात 38 ऑक्सिजनयुक्त बेड व 10 व्हेंटिलेटर (आयसीयु) असलेले बेड येथील डोळ्यांच्या (नेत्र) रुग्णालयाची इमारत व परिसरात तयार करण्यात येत आहे. तर उस्मानाबाद येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे एक महिन्यापर्यंतच्या बालकांसाठी 4 व्हेंटिलेटरयुक्त व 24 उबदार (वार्मर) ऑक्सिजनयुक्त असे एकूण 28 बेडचे शिशु कोविड केअर हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी बालकांसह मातांना राहण्याची देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमरगा येथे 4 व्हेंटिलेटर व 16 ऑक्सिजनयुक्त बेडचे (डीसीएच) लहान मुलांचे हॉस्पिटल तयार करण्यात येत असून, तुळजापूर येथे 4 व्हेंटिलेटर व 6 ऑक्सिजनयुक्त असे एकूण 10 बेडचे हॉस्पीटल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे डॉ. मुल्ला यांनी सांगितले.
वय 0 ते 17 या वयोगटातील ज्या बालकांना कोरोना हा आजार झाला आहे व त्यातून ते बरे झाले आहेत, या रोगाचे विषाणू बालकाच्या शरीरातील सर्व अवयवांवर हल्ला करतात. त्यामुळे अतिशय गांभीर्याने परंतु तितक्याच तातडीने या आजारावर इलाज करणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास बालकेही बरी होऊ शकतात त्यामुळे कोणीही घाबरु नये असे आवाहन डॉ मुल्ला यांनी केले.
बाल रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय पाटील हे अध्यक्ष तर सदस्य म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके, नोडल अधिकारी डॉ. इस्माईल मुल्ला, बालरोग तज्ञ डॉ. संजय सोनटक्के, डॉ. अभय शहापूरकर, डॉ. सुधीर मुळे, डॉ. श्रीनिवास हंबीरे, डॉ. नितीन भोसले, डॉ. प्रसाद धर्मा यांचा यामध्ये समावेश आहे.