374 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता – महाआरोग्य शिबीर होणार
शिक्षण,आरोग्य,पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2023-24 साठी 374 कोटीपेक्षा जास्त रुपये निधि खर्चास मान्यता देण्यात आली यात जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार करावा, तुळजापूर देवस्थानचा विकास श्री बालाजी देवस्थानच्या धर्तीवर करण्यात यावा. जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेला अद्ययावत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी 300 कोटी,जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमास 72 कोटी 50 लाख आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेस 1 कोटी 98 लाख रुपये खर्च करण्यास मंजूरी देण्यात आली. या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यात महाआरोग्य शिबीर घेण्यास मान्यता दिली.
उस्मानाबाद जिल्हा शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असून येथील शिक्षणाचे महाराष्ट्रात नावलौकिक आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना चांगल्या इमारतीत आणि चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकारी आहे. तेंव्हा धोकादायक असलेल्या 650 वर्गखोल्यांना नव्याने बांधण्याची मान्यता देण्यात आल्याचे डॉ.सावंत म्हणाले
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुरेश धस, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, सहायक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अरवत आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी 2021-22 आणि 2022-23 च्या खर्चाचा आढावा सादर केला. अर्थसंकल्पित तरतूद असलेल्या रक्कमेतील 149 कोटी 66 लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून तो निधी वितरीत करण्यात आला आहे .चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेमधून लम्पी स्किन विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी 69 कोटी 57 लाख रुपये एवढ्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.आर्थिक वर्ष 2021-22 साठी मंजूर असलेल्या 354 कोटी 42 लाख 64 हजार रुपयांपैकी 354 कोटी 42 लाख 63 हजार निधी खर्च झाला. या वर्षी कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे उपाय योजना म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे 11 कोटी 82 लाख 16 हजार इतका निधी औषधे व यंत्र सामुग्री साठी खर्च करण्यात आला.
शालेय शिक्षणाच्या पायाभूत सुविधा करिता वेळ पडल्यास अतिरिक्त निधी खर्चास मान्यता देऊ असे सांगून जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर देऊ असे सांगितले. या बरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यात महाआरोग्य शिबीर घेण्यास नियोजन समितीने मान्यता दिली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव सुरू असून या निमित्ताने जिल्ह्यातील मुक्ती संग्राम स्मारकाचा विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली, याबरोबरच जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन क्षेत्राचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला.नियोजन समिती बैठकीत रमाई आवस निधी, स्मशानभूमी, एमएसएमईबी ट्रान्सफॉर्मर, पूर्नवसित वसाहती रस्ते या संदर्भात रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुचना सावंत यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या.