धाराशिव – समय सारथी
परंडा शहरातील सराफ व्यवसायिकाला लुटणाऱ्या दरोडेखोर टोळीतील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने जलद प्रतिसाद पथक आणि दंगल नियंत्रण पथकाच्या सहकार्याने केली.
पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून माढा तालुक्यातील बारलोणी गावात सापळा रचण्यात आला. तेथे संतोष विनायक गुंजाळ (वय 40, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या गुंजाळने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर परंड्यातील समता नगर झोपडपट्टी येथून राजु सिद्धू शिंदे (वय 40, रा. परंडा) यालाही अटक करण्यात आली. पुढील तपासात लव्हळ (ता. माढा) येथील सर्जेराव सखाराम डिकोळे (वय 46) याचे नावही समोर आले.पोलिसांनी तीन आरोपींच्या ताब्यातून एक मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण 1 लाख 97 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास परंडा पोलीस ठाण्यात कलम 309, 3(5) नुसार सुरू असून आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी परंडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथकाचे अधिकारी व अंमलदार सहभागी होते.