27 नोव्हेंबरला महाआरोग्य शिबीर – घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी, तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येेथे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतुन व पुढाकारातून रविवार, दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी परंडा शहरात कोटला मैदान येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिने क्षेत्रातील विविध कलावंत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध मान्यवर ऑनलाईन पध्दतीने यात सहभाग घेणार आहेत.
राज्यातील प्रत्येक व्यक्ती सुदृढ व निरोगी व्हावा यासाठी आरोग्यमंत्री यांनी ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ असा नारा दिला असून या मोहिमेची सुरूवात परंडा येथून केली आहे. ‘प्रत्येक घरातील व घरातील प्रत्येकाची’ घरोघरी जावून सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर महाआरोग्य शिबीर मेळाव्यात मोफत तपासणी व पुढील उपचार केले जाणार आहेत. महिला व पुरूष यांची स्वतंत्र व्यवस्था या शिबीरात असणार असून, घरापासून शिबीरापर्यंत नेन्यासाठी व शिबीर संपल्यावर घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था आरोग्य मित्र यांच्या मार्फत केली जाणार आहे. या आरोग्य शिबीरास जिल्ह्यातील डॉक्टरांसह 5 तज्ञ डॉक्टर्स हे परदेशातुन येणार असून, 50 तज्ञ डॉक्टरांचे पथक या शिबीरात रुंग्णसेवा देणार आहेत. या शिबीरात रुग्णांची रक्त तपासणीसह अन्य तपासण्या करण्यात येणार असून, महिलांची कॅन्सरबाबतची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.
आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या भूम-परंडा-वाशी तालुक्यात आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी विविध पायाभुत सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे रुग्णांची कायमची सोय होणार आहे. महाआरोग्य शिबीराची बैठक आरोग्यमंत्री सावंत यांनी घेतली असून आशा व अंगणवाडी सेवक, सेविका यांचे पथक गावोगावी व घरोघरी जाऊन रुग्णांची प्राथमिक तपासणी करणार आहेत. त्यानंतर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जाणार आहेत. सावंत यांच्यामुळे या तीन तालुक्यांचा आरोग्यसेवांचा दुष्काळ व अनुशेष संपला आहे.आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे आरोग्य दुत बनले असून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात महत्वाचे निर्णय घेत वचनपुर्ति केली आहे.