बंद खोलीत कला, रंगमंच नव्हता – करमणुकीसाठी प्रेक्षकाकडे पास व तिकीट नव्हते, जुन्या गुन्ह्यांची नोंद
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कालिका व गौरी या कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केला असुन तसे आदेश काढले आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी नियमांचा व कायद्याचा भंग होत असल्याने गुन्हा नोंद करून परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता त्यावर आदेश केले आहेत.
चुकीच्या कला केंद्रावर कारवाईच्या सुचना पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिल्या होत्या व ते प्रशासनाच्या पाठीशी ठाम राहिले. गौरी कला केंद्रावर 3 तर कालिका कला केंद्रावर 2 गुन्हे नोंद आहेत त्यामुळे ही कारवाई केल्याचे आदेशात नमुद आहे. बंद खोलीत सगळा प्रकार सुरु होता, तिथे खुला रंगमंच नव्हता. करमणुकीसाठी प्रेक्षकाकडे पास व तिकीट नव्हते शिवाय जुन्या गुन्ह्यांची नोंद अशी कारणे आहेत.
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात तुळजाई कला केंद्रावरील नर्तिक पुजा गायकवाड हिला आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर प्रकरणानंतर धाराशिव जिल्ह्यात कला केंद्राच्या नावावर काही चुकीचे प्रकार व कृत्य होत असल्याची वृत्त मालिका दैनिक समय सारथीने सुरु करीत अनेक बाबी व वस्तुस्तिथी मांडली होती. उपसरपंच बर्गे आत्महत्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला आणि प्रशासनाने गांभीर्य ओळखून कारवाई केली.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इन कॅमेरा व्हिडिओ शूटिंग करीत धाडी टाकल्या, जुने नोंद झालेले गुन्हे व नियमांचा भंग यामुळे परवाना रद्द केले आहेत आता ते कला केंद्र सील करण्याची कारवाई केली जाणार आहे.
तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका असे 5 केंद्र बंद केले असुन महाकाली या केंद्रचा परवाना रद्द करण्याचा पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असुन या कला केंद्र बाबत प्रकरण कोर्टात असुन तिथे शपथपत्र दिले जाणार आहे. महाकाली केंद्रात 2 गटात वाद झाला त्यातून जीवघेणा हल्ला झाला होता.
कला केंद्रातील सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि निता जाधव या 3 नर्तकी महिला उमरगा येथील अभिषेक कालिदास शिंदे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाच्या हत्येत आरोपी असुन पोलिसांनी अटक केली आहे तर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे.
आळणी येथील नटरंग व चंद्राई या 2 कला केंद्रानी परवानगी मिळावी यासाठी प्रस्ताव सादर केला होता मात्र त्यात काही बाबींची त्रुटी असल्याने तो फेटाळला आहे. बाबासाहेब घाटे व अक्षय साळुंके यांनी ‘नटरंग’ तर अरविंद गायकवाड यांनी तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथील चंद्राई कलाचा प्रस्ताव दिला होता. घाटे यांचा पिंजरा कला केंद्र आहे तर साळुंके यांचे महाकाली हे केंद्र आहे, या दोघांनी ‘नटरंग’ या नावाने नवीन प्रस्ताव दिला आहे मात्र त्यात त्रुटी असल्याने तो फेटाळला आहे.