धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटीमधील चोरीच्या गुन्ह्याचा उलघडा करून आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले असुन तब्ब्ल 2 किलो 150 ग्राम सोने व 11 लाख रुपये रोख असा आजच्या बाजारभावाने जवळपास अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी ही माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
3 ऑगस्ट 25 रोजी तुळजापूर लोकमंगल मल्टीस्टेट कॉपरेटीव्ह सोसायटीमध्ये 34 लाख 60 हजार 780 रुपये रोख व 2 किलो 722 ग्रॅमची सोन्याच्या दागिण्यांची चोरी झाली होती. त्या अनुषंगाने सदरील शाखेचे मॅनेजरच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तुळजापूर येथे दाखल करण्यात आला होता. चोरीस गेलेल्या एकुण मुद्देमालाची किंमत 2 कोटी 13 लाख 19 हजार रूपये एवढी प्रचंड असल्याने सदरील चोरीचा तपास पोलीस कसे आणि कधी लावतात या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.
चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हे गोरगरीब जनतेने आपल्या मुलभूत गरजोपोटी तारण कर्जाचे स्वरूपात गहाण ठेवलेले होते. हातावर पोट असलेले नागरीक त्यामुळे चिंतातूर झाले होते. गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने आणि चोरीस गेलेल्या मालमत्तेचे मोठे मुल्य लक्षात घेवून वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सदरील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. गुन्हा घडल्या पासूनच स्थानिक गुन्हे शाखेची अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांची वेगवेगळ्या टीममध्ये विभागणी करून त्यांचेवर सदरील गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
दरम्यानच्या काळामध्ये तांत्रिक माहीतीचे विश्लेषण आणि उपलब्ध सी सी टी व्ही च्या तपासणीवरुन सदरील चोरी त्याच शाखेत कार्यरत असणारा शिपाई दत्ता नागनाथ कांबळे याने केलेली असल्याचा पोलिसांना वाजवी संशय आला होता. परंतु त्यास पकडून त्याचेकडून चोरीस गेलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे हस्तगत करणे अत्यंत आव्हानात्मक होवून बसले होते.
दत्ता हा उच्च विद्याविभुषीत असल्याने आणि गुन्हा करण्यापूर्वीच चांगल्या प्रकारे नियोजन केल्या कारणाने त्यास पकडने कठीण झाले होते. तथापि पोलिसांनी निरंतर प्रयत्न करून दोन महिण्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अंततः दत्ता नागपूर येथे दडून बसल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त केली आणि सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दत्ताने आपणच लोकमंगल मल्टीस्टेट कापरेटीव्ह सोसायटी तुळजापूर शाखेत चोरी केल्याबाबत मान्य केले आणि चोरीस गेलेला मुद्देमाल कोठे लपवून ठेवला आहे याबाबत माहिती देवून तो काढून देण्याची तयारी दर्शविली. आरोपीस अटक करुन मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास सुरुवातील 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्या दरम्यान आरोपीकडून रितसर पद्धतीने चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यात एकुण 11 लाख रूपये रोख रक्कम व 2 किलो 159 ग्रॅम सोन्याचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने प्रयत्नांची पराकाष्ठा करून व्यावसायिक कौशल्याचे तसेच तंत्रज्ञानाचे योग्य वापर करून सदरील गन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेली मालमत्ता यशस्विरित्या जप्त केलेलीbआहे.
सदरील गुन्ह्याचा तपास रीतु खोखर (पोलीस अधीक्षक धाराशिव), शफकत आमना (अपर पोलीस अधीक्षक धाराशिव), निलेश देशमुख उप.वि.पो.अ. तुळजापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, अनिल मांजरे (पो.नि. तुळजापूर), सचिन खटके (स.पो.नि.), अमोल मोरे (स.पो.नि.), विनोद जानराव पोलीस हवालदार, नितीन जाधवर पोलीस हवालदार, दयानंद गादेकर पोलीस हवालदार, बबन जाधवर नाईक पोलीस अंमलदार, मेहबुब अरब (चालक पोलीस हवालदार), प्रकाश बोई वा (चालक पोलीस अंमलदार), सुभाष चौरे (चालक पोलीस अंमलदार) यांनी केला.