हरीतक्रांती- शिवजलक्रांतीच्या कामांना सुरुवात, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा उपक्रम
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या शिवजलक्रांती योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील जलसिंचन कामांना सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात या योजनेतून यावर्षी 500 किमीची नदी नाला सरळीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. या कामामुळे या भागातील दुष्काळचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे, हरीतक्रांतीसाठी हा उपक्रम महत्वाचा ठरत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांच्या हस्ते भुम तालुक्यातील देवांग्रा येथे कामाचा शुभारंभ करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात शिवजल क्रांतीची 1 हजार 150 किमीची कामे पुर्ण झाल्यावर भुम परंडा या भागातील दुष्काळाची धग कमी होण्यास मदत होणार आहे.
मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी भूम परंडा वाशी या त्यांच्या मतदार संघासह धाराशिव व यवतमाळ जिल्ह्यात स्व बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारणाची कामे केली. विकासरत्न डॉ तानाजीराव सावंत प्रतिष्ठान व भैरवनाथ शुगर समुहाच्या माध्यमातून ही कामे होत आहेत. धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 500 व दुसऱ्या टप्प्यात 150 किमी अशी 650 किमी खोलीकरण कामे यापूर्वी केली आहेत. चालु वर्षी 2023 मध्ये आणखी 500 किमीची कामे करण्याचे नियोजन आहे त्यानुसार कामांचा आराखडा गावनिहाय बनविला असुन टप्याटप्याने ही कामे सुरु करण्यात आली आहेत अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा हा भाग कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो, या भागात काही भागात वर्षातील 12 महिने पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असतो ही बाब लक्षात आल्यावर सावंत यांनी ही संकल्पना मांडत 2016 मध्ये नदी, नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकरण अशी जलसंधारणाची कामे हाती घेतली. भुम परंडा तालुक्यातील उल्का, विश्वरूपा, उल्फा, चांदणी, बाणगंगा, रामगंगा, नळी, खैरी, सीना या नदीच्या भागात कामे झाली त्यामुळे हरीतक्रांती होत शेतीचे सिंचन क्षेत्र वाढले त्याच बरोबर पाण्याची भुजल पातळी वाढली असे घोगरे यांनी सांगितले. सावंत यांनी या योजनेला स्व बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असे नाव दिले आहे. 650 किमीची कामे केल्याने त्यांना शिवजलक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प ठरणार नवसंजीवनी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नातून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती आली आहे. या प्रकल्पाच्या 11 हजार 347 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्य मिळाली आहे. धाराशिव व बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 133 गावातील 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. प्रकल्पाने नवसंजीवनी मिळाली असून दुष्काळमुक्तीकडे वाटचाल होणार आहे. जून 2025 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
शेतकरी, महिलांना मदत – विविध कामावर भर
सामूहिक विवाह सोहळे, शेतकरी कुटुंबातील मुलींचे लग्न लावून कन्यादान, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक मदत करीत आधार दिला. महिला बचत गटांना स्वरोजगारसाठी निधी, ग्रामीण भागातील अनेक मुलांना शिक्षण व नौकरीची संधी दिली यासह अनेक विकासकामे पालकमंत्री सावंत यांनी स्वखर्चाने केली आहेत.