सुलतानी कारभार – शेतकऱ्याच्या नावावर 40 तब्बल कोटी रुपयांचा बोजा
कळंब येथील प्रकार – उत्खनन एकाचे मात्र दंड शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर
गौण खनिज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत ,फेरचौकशीचे आश्वासन
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर चक्क 40 कोटींचा बोजा लावण्यात आला आहे. गौण खनिजाचे उत्खनन केल्याचा ठपका ठेवत कळंब तहसीलदाराने कळंब तालुक्यातील मस्सा येथील जोतिराम वरपे या शेतकर्यांच्या सातबारावर 40 कोटीचा बोजा चढवला आहे. प्रत्यक्षात मात्र या शेतकऱ्यांच्या शेतातून गौण खनिजाचा एक दगड देखील उत्खनन केला गेला नाही त्यामुळे गौण खनिजाचे उत्खनन न करतात या सुलतानी कारभाराचा फटका व 40 कोटीचा बोजा पडला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शेगाव ते पंढरपूर हा महत्वकांक्षी प्रकल्प कळंब तालुक्यातून जातो. मेघा कंस्ट्रक्शन ही कंपनी या रस्त्याचे काम करते .या कामासाठी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले. या कंपनीने उत्खनन केलेल्या गौण खनिजाची शासनाकडे रॉयल्टी भरली नाही. हे लक्षात आल्यावर कळंब तहसीलने यासंदर्भात 40 कोटीचा दंड ठोठावला मात्र हा दंड कंपनीला न आकारता याचा बोजा शेतकऱ्याच्या सात-बारावर चढवला आहे. प्रत्यक्षात मात्र वरपे यांच्या शेतात कोणतही गौण खनिजाचे उत्खनन झालंच नाही. कळंब तहसीलच्या या सुलतानी कारभारामुळे हा शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
वरपे हे शेतकरी आपल्या शेतात ठिबक सिंचनाची योजना राबवण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या सातबाऱ्यावर 40 कोटीचा बोजा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. उत्खनन न करताच सातबाऱ्यावर 40 कोटीचा बोजा असल्याचे ऐकून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. हा बोजा तात्काळ कमी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी वरपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
याबाबत कळंब तहसीलदार विद्या शिंदे यांच्याकडे विचारणा केली मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. हे प्रकरण वरिष्ठांच्या कानावर घातलं त्यावेळी या प्रकरणात त्रुटी असल्याचे मान्य करत हे प्रकरण फेर चौकशीसाठी देण्यात येईल असे उपविभागीय अभिकारी अहिल्या गाठाळ यांनी सांगितले.
रस्त्याच्या बांधकामासाठी मेघा कन्स्ट्रक्शन या कंपनीने गौण खनिजाचे उत्खनन केले. ज्या ठिकाणी उत्खनन झाले तो शेतकरी व कंपनीला दंड ठोठावणे अपेक्षित होते मात्र हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे असाच म्हणावा लागेल.