धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांड खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण आदेश दिले आहेत. हा खटला जलदगतीने चालवुन येत्या 3 महिन्यात अर्थात 27 जानेवारी 2026 पुर्वी निकाल द्यावा असे आदेशात नमुद केले आहे. यापुर्वी देखील सुप्रीम कोर्टाने निकालाची डेडलाईन दिली होती मात्र आता पुन्हा नव्याने तारीख दिली आहे. फिर्यादी व आरोपी या दोन्ही पक्षांनी सुनावणी वेळेत पुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे असे म्हण्टले आहे.
आरोपी शुटर दिनेश तिवारी व पिंटू सिंग यांना उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तिवारी व पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर जामीन मंजुर करण्यात आला होता तो रद्द करावा अशी याचिका आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने 27 जानेवारी 26 ही निकालाची तारीख दिली आहे.
मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात यां हत्याकांडाची सुनावणी होत आहे. सरकार पक्षाच्या वतीने सीबीआय व तक्रारदार / याचिकाकर्ता आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने लेखी युक्तीवाद सादर केला आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बाजूने त्यांचे वकील ऍड भुषण महाडिक हे सलग 13 सुनावणीत बाजु मांडत असुन उर्वरित युक्तिवादसाठी 28 ऑक्टोबर तारीख ठेवली आहे.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल वेळेत द्यावा असे आदेश दिल्यानंतर सुनावणीला गती आली आहे. या खटल्यात सर्व बाजुकडील साक्षीदार, पुरावे झाले असुन अंतीम युक्तिवाद सुरु असल्याने खटला सुनावणीच्या अंतीम टप्प्यात आहे. डॉ पाटील यांच्या युक्तीवादनंतर इतर 8 आरोपीचा युक्तीवाद सादर होणार आहे.
हत्याकांडानंतर दिनेश तिवारी याला 25 मे 2009 तर पिंटू सिंग याला 15 जुन 2009 रोजी अटक करण्यात आली होती, तेव्हापासून हे दोन्ही संशयित आरोपी जेलमध्ये होते. साक्षी पुरावे झाल्याने व खटला अंतीम टप्यात असल्याने जामीन रद्द करण्यास नकार दिला. या दुहेरी खुन खटल्यात 9 जण आरोपी असुन 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन सुनावणी सुरु असुन सर्व आरोपी जामीनावर आहेत.
शुटर महात्मा चौधरी उर्फ पिंटू सिंग व दिनेश तिवारी या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन दिला आहे. खटल्याचा निकाल लागेपर्यंत पिंटू सिंग याला दर शनिवारी 11 ते 1 तर दिनेश तिवारी याला दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी 11 ते 2 या वेळेत हजेरी लावली आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन ड्राइवर समद काझी यालाही गोळया घालुन मारण्यात आले. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही.
पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांच्या याचिकेनंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना मुख्य आरोपी करीत राजकीय द्वेषातुन हत्या केल्याचा ठपका ठेवत 9 जणांच्या विरोधात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग व पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांची भुमिका महत्वाची ठरली. याच तपासात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट व सुपारी 30 लाखात दिल्याचे उघड झाले.
आरोपी पारसमल बादला उर्फ जैन हा माफिचा साक्षीदार बनला आहे त्याला सुरुवातीला 25 मे 2009 रोजी अटक करण्यात आली त्यानंतर त्याचं दिवशी 25 मेला शुटर दिनेश तिवारी, 30 मे ला मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, 31 मे ला लातुर येथील सतीश मंदाडेला अटक झाली. खुन घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना मुंबईतुन अटक केली त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.
15 जुन 2009 रोजी शुटर पिंटू सिंग, 10 जुलैला उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, 1 सप्टेंबर 2009 रोजी माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे याला 11 मार्च 2010 रोजी अटक करण्यात आली. 25 सप्टेंबर 2009 रोजी अलिबाग कोर्टाने डॉ पाटील यांना 2 लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. 15 जुन 2009 रोजी शुटर पिंटू सिंग, 10 जुलैला उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, 1 सप्टेंबर 2009 रोजी माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे याला 11 मार्च 2010 रोजी अटक करण्यात आली.












