सुधारीत आरक्षण सोडतीचा आदेश – नामाप्रसाठी मिळणार 4 जागा , 15 नोव्हेंबरला सोडत
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी व लोहारा नगर पंचायत निवडणुक
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी व लोहारा या 2 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर झाला असुन 15 नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी आरक्षण सोडत कार्यक्रम राबवितील. वाशी नगर पंचायतीची मुदत 24 जानेवारी 2021 तर लोहारा पंचायतीची मुदत 6 मे 21 रोजी संपली आहे. यापूर्वीच्या नगर पंचायतीच्या आरक्षण सोडतीत चुक झाल्याने सुधारीत आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत अशी माहिती उस्मानाबाद नगर विकास शाखेचे जिल्हा प्रशासन अधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी दिली.
नगर पंचायतीचा फेर आरक्षण व सोडत कार्यक्रम नव्याने घेण्यात यावी ज्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गचे आरक्षण 27 टक्के पर्यंत असल्याने 17 जागांच्यासाठी कमाल 4 जागांचे आरक्षण वाटप करावे असे आदेशीत केले आहे. यापूर्वी 5 जागा देण्यात आल्याने हे प्रमाण 29.41 टक्के झाले होते त्यामुळे 5 जागा ऐवजी 4 जागा देण्यात येणार आहे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी काढले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी व लोहारा नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या सोडत कार्यक्रमानुसार 15 नोव्हेंबर रोजी सोमवारी नगर पंचायतीच्या सदस्य पदाचा आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. या आरक्षणानंतर 15 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या काळात हरकती व सूचना मागविण्यात येणार असून त्यावर 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होणार आहे. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी 20 नोव्हेंबर रोजी आपला अहवाल सादर करतील. 22 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षणास आरक्षण मान्यता देण्यात येणार असून 23 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षणाबाबत अधिसूचना वृत्तपत्र स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.