सांगवी येथे 5 वर्षीय बालकाचा निर्घृण खून – शेजारील घरात सापडला मृतदेह
निर्दयी – खुनाचे कारण अस्पष्ट, तुळजापूर पोलिसांचा तपास सुरू
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे मन सुन्न करणारी घटना घडली असून एका पाच वर्षीय बालकाचा निर्घुण खून करण्यात आला आहे. मुलाच्या शरीरावर जखमा असून गळा दाबून खून केल्याचे प्रथमदर्शी दिसुन येते.
ओम मनोज बागल असे या बालकाचे नाव असून काल दुपारी हा लहान मुलगा तापीची गोळी आणण्यासाठी घराबाहेर पडला होता त्यानंतर तो घरी परतला नसल्याने एकच धावपळ उडाली.घरच्यांनी रात्रभर शोध घेतला मात्र हा मुलगा सापडू शकला नाही.
आज शुक्रवारी सकाळी या मुलाच्या घराशेजारील असलेल्या एका घरात त्याचा मृतदेह सापडला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या मुलाच्या दोन्ही कानात सोन्याची बाली होती मात्र ती गायब असल्याचे समोर आले आहे. मुलाचा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी डॉग स्कॉड आले आहे.
तुळजापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत .पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.