सत्तेपुढे पायघड्या – तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला थेट प्रवेश व फोटोसेशन
गाभारा प्रवेश बंदी उठवली का ? देवीच्या दरबारात वेगवेगळा न्याय का ? छत्रपतीच्या वंशजाना अडविले
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंटुबातील सदस्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री यांच्या कुटुंबासमोर म्हणजेच सत्तेपुढे पायघड्या घातल्याचे दिसले. शिंदे परिवाराला तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात थेट प्रवेश देण्यात आला तसेच त्यांना तिथे फोटोसेशन करण्याची विशेष मुभा देण्यात आली. यावेळी तुळजाभवानी देवीचा गाभारा हा पुजारी, आमदार, लोकप्रतिनिधी व नातेवाईकांनी भरून गेला होता ज्यामुळे पुरातत्व विभागाचे अनेक मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन झाले.
तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात पुजारी व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नाही,पुरातत्व विभागाच्या अहवालाचा दाखला देत देवीच्या गाभाऱ्यात मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार प्रवेश बंदी आहे मात्र शिंदे कुटुंबाला कोणत्या नियमानुसार गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला,नियम कोण मोडले व कोण, कोणावर कारवाई करणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देवीच्या दरबारात वेगवेगळा न्याय का ? हा प्रश्न भाविक, पूजारी व स्थानिक नागरिकांतून विचारला जात आहे. पुजाऱ्यांनी पाळी नसताना गाभाऱ्यात प्रवेश केला तर देऊळ कवायत नियमानुसार मंदिर प्रवेश बंदीची कारवाई यापूर्वी केली आहे मात्र शिंदे कुटुंबाने गाभाऱ्यात प्रवेश केल्याने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांनचे अध्यक्ष संबंधितावर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल.
एकीकडे छत्रपतींचे वंशज संभाजी महाराज यांना गाभाऱ्यात प्रवेश करुन दर्शन घेण्यापासून रोखले होते त्यावेळी गाभारा प्रवेश बंदीचे कारण पुढे केले गेले त्यावेळी राज्यभर आंदोलन झाल्यावर मंदिर संस्थानने यापूढे काळजी घेत छत्रपती परिवाराचा योग्य सन्मान करू असे सांगत वादावर पडदा टाकला. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना काही पुजाऱ्यांनी गाभाऱ्यात नेहून दर्शन घडविले त्यावेळी शिवसेनेचे तुळजापूर शहर प्रमुख तथा पुजारी सुधीर कदम यांच्यासह 4 पुजाऱ्यावर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली.
मुख्यमंत्री यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे व कुटुंबातील सदस्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करुन दर्शन घेतले व फोटोसेशन केले.शिंदे कुटुंबियांनी श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची यथा सांग पुजा करीत साडी चोळी ओटी भरुन आणि अभिषेक पुजा करुन दर्शन घेतले. शिंदे कुटुंबाचे पारंपारिक पुजारी प्रशांत दिलीप गंगणे यांनी पूजा केली.यावेळी तुळजापूरचे भाजप आमदार तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे विश्वस्त राणाजगजीतसिंह पाटील,अर्चना पाटील,श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन झाल्यानंतर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुंटुबाचा श्रीदेवीचा फोटो पुष्पहार देवुन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे,जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे,माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, अविनाश गंगणे,गुलचंद व्यवहारे, भाजपाच्या महिला प्रदेश सदस्या मिनाताई सोमाजी, तालुकाअध्यक्षा क्रांती थिटे,शिवाजी बोधले,सचिन रसाळ, विकास मलबा,राम चोपदार,सागर पारडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुंटुब तुळजापुर नगरीत दाखल होताच छञपती शिवाजी चौकात फटाक्याची आतिषबाजी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवाराचे भाजपा कार्यकर्त्यांनी जोरादार स्वागत केले.
सकाळी व सायंकाळी अभिषेक पूजा सुरु
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या सायंकाळी अभिषेक पूजा सुरु करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने 7 जुलै रोजी घेतला आहे. तुळजाभवानी मातेच्या दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत अभिषेक पूजा सुरु होत्या मात्र भाविकांच्या मागणीनुसार 7 जुलै पासून सायंकाळी 7 ते 9 या वेळेत अभिषेक पूजा करता येणार आहेत.अभिषेक पूजेचे दर हे 50 रुपये असून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.दररोज सायंकाळी 175 अभिषेक पूजेचे पास देण्यात येणार आहेत त्यामुळे भाविक समाधानी झाले आहेत.
आषाढी वारीसाठी मुख्यमंत्री पंढरपूरला येणार होते त्यानंतर ते तुळजाभवानी दर्शन येण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री आले तर त्यांना गाभाऱ्यात प्रवेशापासून कसे रोखायचे किंवा नाही कसे म्हणायचे हा प्रश्न निर्माण झाला होता.त्यामुळे मंदिर संस्थानने सायंकाळी अभिषेक पूजा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.