संचिका सापडेना तर नगर परिषदेला गुन्हा नोंद करायला वेळ मिळेना – आदेशाला केराची टोपली
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद पुन्हा एकदा संचिका गहाळ असल्याच्या प्रकरणाने चर्चेत आली आहे. बांधकाम परवाना प्रकरणातील संचिका सापडत नसल्याने गुन्हा नोंद करावे असे आदेशीत केले असतानाही गुन्हा नोंद केला जात नाही.
धाराशिव नगर परिषद हद्दीमध्ये पोलिस मुख्यालयासमोरील सर्व्हे नंबर 145/5 मध्ये छत्रपती हौसिंग सोसायटीमधील मंजुर रेखाकनातील प्रसाद रंगनाथ पाटील व पुजा प्रसाद पाटील हे खुल्या जागेत आणि अंतर्गत रस्त्यावर बांधकाम करीत असल्याची तक्रार उदय निंबाळकर यांनी केली होती. त्यात बांधकाम परवान्याची संचिका उपलब्ध नसल्याचे प्रथम नगर परिषदेने कळविले मात्र नंतर पाटील यांना पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी परवाना सादर केला. संचिका सापडत नसल्याचा लेखी अहवाल मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिला. तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी संगनमत करुन ऑफलाईन परवानगी दिल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला.
नगर परिषदेत सध्या ही संचिका नसल्याचे लेखी अहवाल दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. संचिका गायब कोणी केली ? हा प्रश्न आता समोर आला आहे. संचिका उपलब्ध होत नसल्याबाबत गुन्हा दाखल करावा तसेच नगररचना विभागाचे सहायक संचालक यांनी सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 51 नुसार कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त सतीश शिवणे यांनी आदेशीत केले आहे. जवळपास महिना होत आला तरी यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.