शारदीय नवरात्र महोत्सवात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी
तुळजापूर – समय सारथी
महाराष्टाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय महोत्सवात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.महोत्सव कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत तुळजाभवानी मंदिर येथे 200 मीटर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.तहसिलदार तथा मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी होणार असून 26 सप्टेंबर रोजी विधिवत पूजा करुन दुपारी 12 वाजता घटस्थापना होणार आहे.29 सप्टेंबर रोजी देवींची रथ अलंकार पूजा, 30 सप्टेंबर रोजी ललित पंचमी असून मुरली अलंकार पूजा,1 ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार पूजा, 2 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार पूजा, 3 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी असून महिषासुर मर्दीनी अलंकार पूजा तर 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असणार आहे.
तुळजाभवानी मंदिर प्रशासन, नगर परिषद तुळजापूर व उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल या नवरात्र उत्सवाची तयारी करीत आहे