विश्वासातून प्रगतीकडे , आता प्रतीक्षा संपली – लोटस मल्टीस्टेट मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर मंजूर
श्री सिध्दीविनायक परिवार यांच्या उपक्रमाला केंद्र सरकारची मान्यता प्राप्त, आता वैद्यकीय क्षेत्रात उडी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील श्री सिध्दीविनायक परिवारच्या मल्टीस्टेट मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे एका सुसज्ज मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची उस्मानाबादकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. विश्वासातून प्रगतीकडे हे ब्रीद वाक्य घेऊन अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सिद्धिविनायक परिवाराने सुरु केलेली वाटचाल यशस्वी ठरत आहे.
सहकार, उद्योग,व्यापार व सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या श्री सिध्दीविनायक परिवार, उस्मानाबाद या संस्थेस केंद्रीय सहकारीता मंत्रालय, दिल्ली यांच्या कार्यालयाकडून “लोटस मल्टीस्टेट मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, उस्मानाबाद.” या नावाने वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. नुकतेच याबाबबतचे पत्र संस्थेस प्राप्त झाले आहे.
या वैद्यकीय संस्थेच्या माध्यमातून हॉस्पिटल उभा करणे तसेच समाजाच्या आवश्यकतेनुसार, समाजातील सर्व घटकांना परवडेल या दृष्टीने वैद्यकीय सेवा पुरवणे, रुग्णांवर आर्थिक बोजा न पडता त्याला योग्य तो उपचार मिळेल या साठी या संस्थेच्या माध्यमातून काम केले जाईल.
या संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद शहरात आगामी कालखंडात अद्ययावत असे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल उभा करण्याचा मानस असल्याचे श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगीतले.श्री सिध्दीविनायक परिवारातील सर्वच उपक्रमांवर समाजाचा विश्वास आहे. त्या विश्वासास पात्र राहूनच वैद्यकीय क्षेत्रात कार्य केले जाईल असाही विश्वास दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केला.