कळंब – समय सारथी
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण व खुन प्रकरणातील मुख्य आरोपी अतिश जाधव याला धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा व धाराशिव पोलिसांनी ही कारवाई केली. वाघ यांचे हडपसर येथून अपहरण करुन खुन करण्यात आला होता, पुर्ववैमनस्यातुन शेजारी राहणाऱ्या भाडेकरून त्यांची 5 लाख रुपयांची हत्येची सुपारी देण्यात आली होती. यापुर्वी 4 आरोपीना अटक केली आहे.
सतीश वाघ यांचे 9 डिसेंबरला पहाटे अज्ञात व्यक्तींकडून चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आले होते.अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांतच आरोपींनी सतीश वाघ यांचा गाडीतच खून केला असल्याची माहिती समोर आली. वाघ यांना तब्बल 72 वेळा चाकूने भोसकण्यात आले त्यात त्यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले असून, पाठीवर देखील वार करण्यात आले. वाघ यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून दिला. सायंकाळी त्यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली.
सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा आहेत. सतीश वाघ हे शेतकरी असून हडपसर परिसरातील मांजरी भागात त्यांची शेती आहे, त्यांचा व्यवसाय देखील आहे. काही हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.