लाचलुचपत विभागाची कारवाई – येरमाळा सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे अखेर जाळ्यात
पोलीस पाटील लाचेचा भागीदार , लाखांची मागणी करून 70 हजार मागितले
दिवाळीपूर्वीच फटाके वाजले – मुंडे यांच्याबाबत अनेक तक्रारी, चौकशी होणार का ?
उस्मानाबाद – समय सारथी
निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी ७० हजार लाचेची मागणी करणाऱ्या येरमाळा पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश मुंढे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलीस पाटील हा भागीदार व मध्यस्थी आहे. मुंडे यांच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी असून त्याची चौकशी पोलीस अधीक्षक निवा जैन करणार का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंडे यांनी तेरखेडा येथील काही फटाके व्यवसायिकांना व वसुलदारांना हाताशी धरून इतर नवीन दुकानदार यांना त्रास देणे, कारवाईची भीती दाखवुन अनेक गैरप्रकार केले असल्याच्या तक्रारी आहेत. दिवाळीच्या तोंडावर फटाके व्यवसायिकांकडुन जोरदार वसुली मोहीम राबविण्याचा डाव लाचलुचपत विभागाच्या कारवाईने फसला असुन दिवाळीपूर्वीच फटाके वाजले आहेत.दरम्यान गणेश मुंडे व पोलीस पाटील हे दोघेही फरार आहेत.
तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी गणेश मुंढे, स.पो.नि. पो.स्टे. येरमाळा यांनी रत्नापुर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर यांचे मार्फ़तीने तक्रारदार यांच्याकडे 22 ऑगस्ट 2021 रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी करून तड़जोडी अंती दोन्ही आरोपी यांनी 70 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारन्याचे पंचांसमक्ष मान्य केले होते.
आरोपी यांची लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज रोजी त्यांच्या विरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.सदरची कार्यवाही डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद .विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद व प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अशोक हुलगे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड,विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली.लाचेसंबंधी तक्रार असल्यास प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद यांच्याकडे मोबाइल क्र.95279 43100 ,कार्यालय क्र.02472 222879 किंवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.