रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उपलब्धेसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करा – पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे आदेश
उस्मानाबाद:-समय सारथी
जिल्हयातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोज सायंकाळी आढावा घ्यावा.येणाऱ्या आडचणी सोडवून रूग्णांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा द्याव्यात. रेमडेसीवीर इंजेक्शनची टंचाई भासणार नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करा,असे आदेश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी व्हिडीओ कॉर्न्फसिंगव्दारे घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.
कोरोना पॉझिटिव्ह असतानाही पालकमंत्री गडाख यांनी आज जिल्हयातील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉर्न्फसिंगव्दारे संवाद साधून जिल्हयातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचनाही केल्या.या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के. पाटील, डॉ.सचिन बोडके तसेच मंत्रालयातून पालकमंत्र्यांचे खासगी सचिव बप्पासाहेब थोरात,जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हणमंत वडगावे,जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.मिटकरी आदी सहभागी झाले होते.
कोरोना पासून लोकांचे जीव वाचविणे, त्यांची काळजी घेणे हीच सध्याच्या परिस्थीतीत आपले प्राधान्य असले पाहिजे, त्यासाठी प्रत्येक रुग्णाला आवश्यक तो औषधोपचार मिळाला पाहिजे.औषधाची गरज असेल तर मी संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी बोलून पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची विनंती करतो.जिल्हयात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत आहे,परंतु आणखी ऑक्सिजन सिलिंडरची गरज असेल तर मी अन्न व औषध विभागाचे मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना विनंती करून जिल्हयास होणारा दोन दिवसा आडचा ऑक्सिजन पुरवठा दररोज करण्यास सांगतो.परंतु पुरेशी साधन सामग्री असलीच पाहिजे,याकडे लक्ष वेधून पालकमंत्री गडाख म्हणाले की, ज्या नागरिकांच्या घरी होम ऑयसोलेशनची सोय आहे,अशानाच त्यांच्या घरी जाऊ द्या,अन्यथा त्यांची आपल्या कोरोना केंद्रात व्यवस्था करा.जिजामाता मुलींचे वसतीगृह येथे सुरू करण्यात आलेले कोरोना फॅसीलिटी केंद्र ही अतिशय उत्तम संकल्पना आहे.हे केंद्र चोवीस तास सुरू करण्यात यावे,असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हयात विनामास्क कुणी फिरणार नाही,नागरिक गर्दी करणार नाहीत, जेणकरून कोरोनाचा फैलाव होण्यास मदत होईल अशा लोकांवर पोलीसांनी नियमाप्रमाणे कारवाई करावी,त्यासाठी पोलीसांनी त्यांची गस्त वाढवावी,यंत्रणा राबवावी , असे सांगून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हाधिकारी यांनी त्याच्या भावना समजावून घ्याव्यात आणि त्यावरून एक अहवाल तयार करुन राज्य शासनास पाठवावा, असे सांगून पालकमंत्री गडाख म्हणाले की, कोरोना टेस्टच्या संख्येत वाढ करावी, त्याच बरोबर जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्याच्याही कोरोना चाचण्या कराव्यात.जिल्हयात कोरोना लसीकरणाचे काम चांगले चालू आहे. 93 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. याबाबत समाधान व्यक्त करून कोणत्याही स्वरूपात नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, यांची दक्षता घेऊन काम करा,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हयात आरटीपीसीआर कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक ती यंत्र सामग्री तात्काळ उपलब्ध करा, असे सांगून पालकमंत्री गडाख म्हणाले पुरेसा औषधसाठा करण्याबरोबरच रेमडेसीवीर इंजक्शनच्या साठया बाबत तक्रारी येत असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून असा गैर प्रकार करणाऱ्यावर कारवाई करा, या औषधीचा आणि इंजक्शनचा काळाबाजार होऊन टंचाई निर्माण होणार नाही यांची दक्षता घ्या, यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून याबाबीवर नियंत्रण ठेवा, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीच्या सुरूवातीस जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी जिल्हयातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत केलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती दिली.त्याचबरोबर डॉ.फड,डॉ.पाटील यांनीही यावेळी माहिती दिली.