शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा इशारा , महाविकास आघाडीत वाद पेटला
उस्मानाबाद – समय सारथी
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर कार्यक्रमात 1 कोटींचा निधी देण्यावरून ‘ मरू द्या मुख्यमंत्री ‘ आपण आपले बघू , अशी भाषा वापरल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून शिवसेनेचे उपनेते,सोलापूरचे संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी पालकमंत्री भरणे यांना शिवसेनेच्या भाषेत सज्जड दम दिला आहे.
पालकमंत्री भरणे मामा तुम्ही तुमच्या औकातीत रहा व शब्द वापरा , आम्ही बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर तुम्ही सत्तेवर आलात, तुम्हाला तर जनतेने फेकून दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादने तुम्ही सत्तेत आहेत हे कधीच विसरू नका आणि तुम्ही अशी मुख्यमंत्री विरोधात वक्तव्य करतात. सत्तेत असताना म्हणता मरू द्या मुख्यमंत्री ही भाषा शब्द वापरता. तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द व भाषा वापरा, तुमच्यात हिम्मत असेल व तुम्हाला आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर सोलापूर जिल्ह्याची हद्द उजनी धरण ओलांडून दाखवा आम्ही एका क्षणात दाखवू असा दम आमदार सावंत यांनी दिला आहे.
फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे आणि राज्यात महाविकास आघाडी आहे , त्याला तडा जाईल असे वक्तव्य कोणत्याही शिवसैनिक व पदाधिकारी यांनी करायचे नाही या एका बंधनात राहून आम्ही खाली मान घालून गप्प बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या छाताडावर बसून कोणत्याही पद्धतीने नाचावे व आमच्या पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी गलिच्छ भाषा वापरावी. तुमच्या या वक्तव्याचे योग्य वेळी, योग्य ती शिक्षा दिल्या शिवाय हा शिवसैनिक शांत राहणार नाही. तुमची हिम्मत असेल तर सोलापूरची हद्द ओलांडून दाखवा असे आव्हान उपनेते आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी राज्यमंत्री भरणे याना दिले आहे. या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीत वाद पेटला आहे.