धाराशिव – समय सारथी
तुळजापूर यात्रा मैदान जागा हडप प्रकरणी गठीत चौकशी समितीचा अंतीम अहवालात दिरंगाई होत असुन या दिरंगाईस जबाबदार अधिकारी यांची चौकशी करावी. यात्रा मैदानाच्या जागेत बोगस लेआउट केल्याने गुन्हा नोंद करून त्याची उच्च स्तरीय चौकशी करावी अशी मागणी करीत या बाबतची तक्रार आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यात्रा मैदान प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी एन्ट्री केल्याने याचे गांभीर्य वाढले असुन आगामी अधिवेशनात हा मुद्दा गाजु शकतो.
तुळजापूर नगर परिषदेने यात्रा मैदानासाठी सर्वे नंबर 138 मधील 2 हेक्टर 63 आर इतकी जमीन संपादीत केली मात्र ती जागा हडप केल्याची व विक्रीची तक्रार संभाजी शिवाजीराव नेप्ते व किरण माणिकराव यादव यांनी केली होती, त्यानंतर त्या तक्रारीची तहसीलदार अरविंद बोळंगे अध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार सचिव व सदस्य मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी अशोक भातभागे यांनी चौकशी करून अहवाल दिला आहे.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 7 अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. या समितीत उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी ओंकार देशमुख सचिव, उपाध्यक्ष उपजिल्हाधिकारी निवडणुक शिरीष यादव, सदस्य म्हणुन जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख, जिल्हा सहनिंबधक, सहाय्यक नगर रचनाकार व उपायुक्त नगर परिषद प्रशासन त्रिंबक डेंगळे पाटील हे सदस्य आहेत.
उपविभागीय अधिकारी,भुमी अभिलेख, नगररचना, नगर पालिका प्रशासन अधिकारी, जिल्हा निबंधक यांसह अन्य विभागाच्या अधिकारी यांना समितीने कार्यवाही करून त्यांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्यास सांगितले होते मात्र काही जणांनी अहवाल दिला नसल्याचे कळते त्यामुळे पुढील कारवाई झाली नाही.
बनावट रेखाकन नकाशे, अकृषी व बांधकाम परवाने, खरेदी विक्री खत करणारे तत्कालीन नगर परिषद, भुमी अभिलेख, मुद्रांक विभागातील अधिकारी, काही बाबींना मंजुरी दिलेले नगर परिषदेतील तत्कालीन काही पुढारी व अधिकारी कारवाई करावी. बोगस लेआऊट सह अन्य दस्त प्रकरणात गुन्हे नोंद करावे.











