‘मेळावा’ शिवसेना पदाधिकारी यांचा , ‘शाळा’ मात्र लोकप्रतिनिधी, पत्रकार व अधिकाऱ्यांची – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत पुन्हा गर्जेले
नेत्यांवर चौफेर टीका, केंद्रस्थानी विकासाचा मुद्दा – हप्ता, टक्केवारीचा आरोप – माझं स्थान कोनशीलेवर नसुन जनतेच्या हृदयात कायम
मंत्री सावंत यांनी जनतेसाठी ‘ही’ कामे केली तर सावंताना सत्तापरिवर्तनाची ही रिटर्न ‘भेट’ मिळाली – ऑक्टोबरला तेरणा सुरु करणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, खासदार, आजी माजी आमदार, पत्रकार व अधिकाऱ्यांची एक प्रकारे कार्यशाळा घेतली. विकासाच्या मुद्याला केंद्रस्थानी ठेवत मंत्री सावंत यांनी हप्ता, टक्केवारी सारखे आरोप केले तर माझं स्थान कोनशिलेवर नसुन जनतेच्या हृदयात कायम असल्याचे सांगत राजकीय विरोधकांचे कान टोचले.
लोकप्रतिनिधी, पत्रकार व अधिकारी यांना वैचारिक उपदेशाचे डोस पाजले त्यामुळे मेळावा कार्यकर्ते यांचा आणि शाळा तिघांची अशीच चर्चा परंड्यात रंगली. अधिकारी यांना शासकीय जबाबदारी तर पत्रकार यांना त्यांनी पत्रकारिता धर्म यानिमित्ताने शिकवीत मार्गदर्शन केले. तेरणा साखर कारखाना ऑक्टोबर महिन्यात सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केल्याने दिलासा मिळणार आहे. परंडा येथील कार्यक्रम व्यासपीठावर सावंत यांच्यासाठी शाही सोफा होता मात्र त्यांनी तो नाकारत साध्या खुर्चीवर बसने पसंद केले.
शासकीय योजना आली की त्यातील त्रुटी शोधून नागरिकांकडुन लाभ देतो म्हणून हजार, दोन हजार लुटायचे हा धंदा काही जणांचा सुरु असतो त्यामुळे पैसे देऊ नका असे आवाहन मंत्री डॉ सावंत यांनी केले. लोकप्रतिनिधी यांनी 10 टक्के कमिशन हप्ते घेण्याचा काळ संपला असुन त्या लोकांना जनतेशी काही देणे घेणे नाही अश्या हप्तेखोर प्रवृत्तीच्या लोकांना जनतेने सत्तापरिवर्तन करुन बाजूला केले असुन जनतेच्या मनातला सेवक, सरकार आणले आहे असे सावंत म्हणाले.
पहिल्या दिवसापासून अधिकारी यांना सांगत आहे की माझी कामाची पद्धत वेगळी आहे, पुर्वीसारखा 10-10 वर्ष आमदारकी असल्यासारखी कामाची पद्धत नाही. नवीन अधिकारी यांनी जुन्या अधिकारी यांच्याकडून शिकावे, माझ्या कामाची पद्धत माहिती करुन घ्यावी. मला आमदार म्हणून मान द्या किंवा नं द्या चालेल मात्र शेतातून आलेल्या तळागाळातील लोकांना ते कार्यालयात आल्यावर खुर्ची द्या हा माझा हट्ट आहे. लोकशाहीच्या माध्यमातून लोकांची प्रतारना केली तर मी त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही. झिरो पेंडेन्सी कामात ठेवावी. शेतकरी स्वाभिमानी आहे त्याला आदराने स्थान द्या तो देणारा पोशिंदा आहे. अधिकारी यांच्या पगारी, गाड्या, पंखे, पेनातली शाई, कागद हा सगळा खर्च शेतकऱ्यांच्या जीवावरचा आहे आणि लोकप्रतिनिधी त्यांनी दाबलेल्या बटनावरती आहे हे कायम लक्षात ठेवले पाहीजे या मताचा मी लोकसेवक आहे.
सरकारची वर्षपूर्ती झाली मात्र मंत्रीपद घेऊन मला वर्षपूर्ती झाली नाही ती 11 ऑगस्ट रोजी होत आहे. सत्ता असताना मला सत्तेतून बाजूला केले, मी 11 महिन्यात काय केले हे विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे. दोन अडीच वर्ष झालेल्या कामात, वैचारिक, दुरदृष्टी बाबीत फरक आहे. एखादे पुस्तक होईल इतक्या योजना निधी राबविल्या गेल्या. तुमचा आमदार भ्रष्टाचार करतो का ? हप्ते मागतो का ? वर्गणी गोळा करतोय का ? हे लोकांनी विचारले पाहिजे. तुमचा विश्वास व विकास हेच माझ्यासाठी अंतीम सत्य आहे.
30-40 कोटी मी माझ्या मतदार संघात अतिरिक्त आणले. आतापर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधी याने इतकी कामे 40-50 वर्षात आणली नाहीत. त्याबाबत काहींनी चौकशी, तक्रारी पत्र दिले. माझ्या मतदार संघावर जो इतके वर्ष अन्याय झाला. कोणीही कितीही बोलल, आदळाआपट केली तरी मला फरक पडणार नाही मग लोकप्रतिनिधी असो किंवा नसो. शिवजल, चारा छावणी, पाणी टाक्या, बचत गट निधी ही कामे सत्ता नसताना केली. भाजप आमदार राणा पाटील यांनी समसामान निधीवरून मंत्री सावंत यांची लेखी तक्रार केली होती त्यावर बरेच वादंग झाले होते.
जे भाष्य करतो त्यावर काही पत्रकार सकारात्मक तर काही नकारात्मक मनाचे पत्रकार असतात, काही जणांना विचित्र बातम्या देऊन धंदा चालवायचा असतो. पत्रकार लोकशाहीचा स्तंभ असतो. खरा जातीवंत पत्रकार जर कोणी असेल तर त्याने सुद्धा लिहले पाहिजे की या जिल्ह्यातील किंवा मतदार संघात गेल्या 40 वर्षाच्या तुलनेत गेल्या 9 महिन्यात किती निधी आला. सर्वसामान्य जनतेला कळणार नाही, तुम्ही पत्रकार विद्वान असतात त्यांना सगळ्या गोष्टीची इंतभूत माहिती असते त्याआधारे पत्रकारितेची शपथ घेऊन सांगितले पाहिजे की मी निधी आणला की नाही ?
जनतेचा अजूनही नाही म्हणले तरी 10 टक्के पत्रकारितेवर विश्वास आहे, त्याच त्या ठरलेल्या बातम्या, तीच ती लोके जणू काही लोकांची बुद्धी हँग झाली त्यांना काही कळतं नाही पण सत्य हे सत्य असते जसे कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवतो. माझे जनसेवेचे वृत्त आहे,ते चालूच राहणार आहे, तुम्ही काहीही लिहा, दाखवा मला फरक पडत नाही असे त्यांनी पत्रकारांना सांगत नाशिकच्या मेरी संस्थाकडे मी मंत्री नसताना उजनी पाण्यासाठी पाठपुरावा केला.पत्रकारांनी टीका करण्या ऐवजी विकासाच्या मुद्यावर लिहावे असे आवाहन करीत काही अपेक्षा व्यक्त केली. गेली 40 वर्षापासुन 21 टीएमसी पाणी आले नाही ते आणून दाखवणारच असे सावंत म्हणाले.
काही लोकप्रतिनिधी यांची भावना व विचार पाहिले की हसू येते. काय तर तो आमदार, खासदार लई भारी आहे. फोन आला की फोन उचलतो. फोन उचलतो भावनिक बाब ठीक आहे पण फोन उचल्ल्याने विकास, रस्ते, वीज या समस्या सुटतात का ? आपण कशावर खुश असतो. मी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांना सर्व विचारू शकतो, तुमच्या माध्यमातून विचारू इच्छितो विकासाचं काय ? ज्या पद्धतीने भुम परंडा मतदार संघात विकास झाला आहे किंवा जो सुरु आहे त्याप्रमाणे इतर मतदार संघात का झाला नाही ? त्याला जबाबदार कोण ? हे पण विचारले पाहिजे. फोन उचलून लोकात प्रसिद्धी मिळविने म्हणजे विकास, जो पर्यंत शेतकरी सुखी समाधानी होत नाही तो पर्यंत तो लोकप्रतिनिधी म्हणण्यास लायक नाही असे मत मंत्री सावंत यांनी मांडले.
पत्रकारिता आता सोपी झाली आहे, लोकप्रतिनिधी यांनी पत्रकारांचे गट करण्यापेक्षा पत्रकारिता स्वीकारली पाहिजे, तो चांगला धंदा आहे, तो व्यवस्थितीत चालतो असा सल्ला दिला. पत्रकार यांनी त्यांच्या विद्वात्तेचा 10 टक्के जरी वापर जनतेसाठी केला तर कामे होतील व राज्यात विकासाचा खारीचा वाटा होईल असे आवाहन पत्रकार यांना केले.
दैनिक सकाळ वृत्तात धाराशिव टूडे पानावर एक बातमी होती त्यात पत्रकार यांनी लिहले की मंत्री सावंत जिल्ह्यात येत नाहीत, तिकडे बसतात, स्वतःचे उद्योग धंदे सांभाळतात, लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. मी या बातमीने खुश झालो, माझी त्यांनी एक प्रकारे प्रशंसा केली, मी उद्योगपती म्हणून पात्र असल्याचे प्रशस्ती पत्र दिले.उद्योग धंदा करणे ही माझी पॅशन आहे त्यामुळेच मी इथे सर्वासमोर उभा आहे. मी तहसील, पोलिस स्टेशनं या ठिकाणी हप्ते गोळा करीत बसलो नाही. शासकीय योजना हातात नसल्या तरी सीएसआर माध्यमातून काम केले व लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. मिस्टर 10 टक्के वाला म्हणून कधी वावरलो नाही आणि वागणार नाही. ज्या वेळी ती वेळ येईल तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा माझा हक्क नाही, मी नालायक ठरेलं आणि हाच फरक आहे. हो मी उद्योग धंदे करतो, लोकांना रोजगार देतो असे सावंत म्हणाले.
एक साखर कारखाना होता तो सुद्धा चालवता आला नाही, ही तुमची बुद्धीमत्ता. तेरणा सारखा कारखाना तुझं की माझं या वादात 12 वर्ष कारखाना बंद पाडला, नशीब त्यांनी झाडे जाळून कोळसा विकून पैसा घेतला नाही. शेतकरी सभासद कामगार डोळे लावून बसलेत त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर कारखाना सुरु करणार व त्याचे लोकार्पण सोहळा करणार हा माझा शब्द आहे. मी जनतेसाठी करतो, स्वतःचे अस्तित्वासाठी करत नाही असे म्हणत सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील व माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
रेल्वे कार्यक्रमात शेजारील बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांचे नाव होते मात्र पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे मंत्री व आमदार म्हणूनही कोनशीलेवर नाव नव्हते, त्यांचे एकप्रकारे मंत्री असतानाही राजकीय अस्तित्व डावलण्यात आले त्याचा समाचार भाषणात घेतला. माझं नाव पाटीवर नसेल माझं नाव जनतेच्या हृदयात, घराघरात आहे. कोण जनतेतला व कोण पाटीवरचा याचा फरक हीच जनता करणार आहे व हे लवकरच कळेल, घोडा मैदान जवळ आले आहे असे सांगत कुरघोडी करणाऱ्या राजकीय मंडळीना इशारा दिला.
मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी ‘हे’ केले व त्यांना ‘हे’ मिळाले
शिंदे फडणवीस या सत्ता परिवर्तनाच्या बंडानंतर आमदार डॉ तानाजीराव सावंत यांना सत्तेत मंत्री पदाच्या रूपाने वाटा मिळाला. हिंदुत्व व जनतेच्या मनातील कौल असे सांगत सत्ता परिवर्तनासाठी सावंत यांनी शिंदे व फडणवीस यांच्यात 150 बैठका घेतल्याचा दावा भाषणात केला. मंत्री झाल्यावर धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा वाशी या मतदार संघाला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले. रस्ते, सिंचनासह ग्रामीण रुग्णालय व इतर आरोग्य विषयक बाबीसाठी रुग्णालये मंजुर होत करोडो रुपयांचा विक्रमी निधी इतर तालुक्याच्या तुलनेत मिळाला. 21 टीएमसी पाणीसह अन्य प्रलंबित विषय विकासाच्या पटलावर आले आहेत.
सावंत मंत्री झाल्यावर त्यांचा अद्याप लोहारा, उमरगा, तुळजापूर या भागात एकही शासकीय कामांचा दौरा, जनता दरबार वा आढावा बैठक झाला नाही तर पालकमंत्री म्हणून इतर तालुके व मतदार संघाना फारसे काही मिळाले नाही, हेही एक वास्तव आहे. इतके दिवस आयात पालकमंत्री अशी धाराशिव जिल्ह्यात प्रथा होती मात्र सावंत पालकमंत्री झाल्याने संपुर्ण जिल्ह्यात विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
सावंत यांना मंत्रीपद बहाल केल्यानंतर दुसऱ्याच कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 17 नोव्हेंबर रोजी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ अर्थात जेएसपीएम हे स्वतंत्र विद्यापीठ मंजुरीचा निर्णय झाला त्यानंतर जेएसपीएम युनिर्व्हसिटी विधेयक दोन्ही सभागृहात मंजुर झाले. नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता त्यानुसार विद्यापीठ मंजुरी मिळाली आहे. हे विद्यापीठ पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात उभारण्यात येणार आहे. मंत्री झाल्यावर सावंत यांना एक प्रकारे हे एक रिटर्न गिफ्टच दिल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील पवार,देशमुख, मुंडे,पाटील यासारख्या दिग्गज राजकीय घराणे, नेत्यांना किंवा शिक्षण सम्राटांना जे जमले नाही ते मंत्री सावंत यांनी स्वतंत्र विद्यापीठ मंजुरी पदरात पाडून एका झटक्यात ‘करुन दाखविले’ हीही जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे असेच आता म्हणावे लागेल.
मंत्री सावंत हे परभणी जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री असुन तिथे सावंत यांनी डीपीडीसी अंतर्गत दिलेल्या 150 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मंजुरीना खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांच्यासह इतर नेत्यांनी याबाबत तक्रार केली होती. परभणी येथे निधी वाटपाचा गोंधळ सर्वश्रुत आहे. शिवसेनेला वगळून विरोधी पक्षांसह भाजपला सर्वाधिक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.