एकच सिंह पदमसिंह , माझा तेरणेचा वाघ आला असे म्हणत बहिणीकडून स्वागत
उस्मानाबाद – समय सारथी
एकच सिंह पदमसिंह , माझा तेरणेचा वाघ आला असे म्हणत पुष्पाताई पाटोदेकर यांनी डॉ पदमसिंह पाटील यांचे स्वागत केले व रक्षाबंधन साजरे केले. डॉ पदंमसिंह पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री असून त्यांनी गेल्या 60 वर्षाच्या राजकारणात ऊर्जा, पाटबंधारे मंत्री अशी पदे भूषविले आहेत तर त्यांच्या बहीण पुष्पाताई ह्या उस्मानाबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राहिल्या आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील यांनी त्यांची बहीण पुष्पाताई पाटोदेकर यांच्या उस्मानाबाद येथील घरी जाऊन राखी बांधुन घेतली यावेळी बहीण भावांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस करून पेढा भरवला, पुष्पा ताई यांनी डॉ पाटील यांचे औक्षण केले. वयाच्या 82 व्या वर्षी डॉ पदमसिंह पाटील यांनी त्यांची मोठी 83 वर्षीय बहीण पुष्पाताई यांच्या हातून राखी बांधली व आशीर्वाद घेतले. डॉ पदमसिंह पाटील हे राज्यातील राजकारणातील एक ज्येष्ठ अनुभवी नेतृत्व व मोठे प्रस्थ आहेत. यावेळी डॉ पाटील यांचे भाचे अमोल पाटोदेकर, भाची अस्मिता पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
डॉ पाटील भाऊ बहीण यांच्या एकमेकांवरील प्रेम, आपुलकी पाहून वातावरण भावनिक झाले होते.