महाज्योतीच्या विमान प्रशिक्षण योजनेत 4 वर्षांपासून बंद पडलेल्या कंपनीला अडीच कोटी दिले
उस्मानाबाद – समय सारथी
मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर माजी आमदार तथा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी अडीच कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला. वडेट्टीवार यांना हा घोटाळा पचवू देणार नाही, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा महाज्योती कार्यालयावर विद्यार्थीना घेऊन मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेंडगे यांनी दिला. शेंडगे हे उस्मानाबाद येथे ओबीसी आरक्षणसाठी बैठक घेण्यासाठी आले होते त्यांनतर त्यांनी हे आरोप केले.
नागपूर येथील नागपूर फ्लाईंग क्लब या 4 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कंपनीला ओबीसी विद्यार्थीना विमान चालविण्याचे प्रशिक्षणाचे काम दिले.नागपूर फ्लाईग क्लबला अडीच कोटी देऊन 6 महिने झाले तरी एकाही विद्यार्थीला प्रशिक्षण दिले गेले नाही. बंद पडलेल्या या प्रशिक्षण कंपनीकडे स्वतःचे विमान नाही , प्रशिक्षक नाही तर व्यावसायिक म्हणजे कमर्शिअल पायलट ट्रेनिंग देण्याचा परवाना नाही तरी अडीच कोटी दिले गेले असा आरोप त्यांनी केला.
बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती सुरू केली. यातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार केली व करोडो रुपये दिले गेले मात्र एकही विद्यार्थीला अद्याप प्रशिक्षण दिले गेले नाही त्यामुळे विद्यार्थीची ससेहोलपालट होत आहे. 17 जून 2017 पासून प्रशिक्षण देणारी नागपूर क्लब बंद आहे त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही,विमान, प्रशिक्षक नाहीत. या खात्याचे मंत्री वडेट्टीवार नागपूरचे, महाज्योतीचे कार्यकारी संचालक डांगे हेही नागपूरचे तर प्रशिक्षण देणारी कंपनी नागपूरची त्यामुळे हे सगळे साटेलोटे केले आहे. हा विमान प्रशिक्षण घोटाळा त्यांना पचवू देणार नाही असे शेंडगे म्हणाले. महाज्योतीचे संचालक स्वतः या संस्थेचे अध्यक्ष वडेट्टीवार यांचा राजीनामा मागत नवीन अध्यक्ष देण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करीत आहेत. शेंडगे यांनी आरोप केल्याने महाज्योतीची विमान प्रशिक्षण योजना व मंत्री वडेट्टीवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
तर भीक मागुन लोकांतुन पैसे गोळा करू पण काम करा
ओबीसी आरक्षणबाबत इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सरकारकडे निधी नसेल तर सरकारने आम्हाला सांगावे , आम्ही भीक मागून पैसे गोळा करून आयोगाला देऊ पण काम सुरू करा.केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाला आरक्षण नाही त्यांच्या चुकांची शिक्षा ही संपूर्ण समाजाला दिली जात आहे यामुळे 56 हजार कार्यकर्ते यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करू दिले जाणार नाही यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शेंडगे यांनी दिला. इम्पेरिक डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने कोर्टात वेळ मागावा, कोर्टात आरक्षण टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे त्यानुसार पावले उचलणे गरजेचे आहे कोर्टात आरक्षण टिकेल अशी अपेक्षा शेंडगे यांनी व्यक्त केली.मागासवर्ग आयोगाचे सदस्य काम, निधी व इतर यंत्रणा नसल्याने राजीनामा देत आहेत, काम ठप्प आहे .अजून काय भोग भोगायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ओबीसीचा आरक्षणचा घटनात्मक अधीकार कोणी काढून घेऊ शकत नाही त्यामुळे निवडणुका पुढे ढकला किंवा अद्यादेशनुसार घ्या असे ते म्हणाले.
यावेळी ओबीसी जनमोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर,प्रा टी पी मुंडे, चिटणीस रफिक कुरेशी,उस्मानाबाद येथील दत्तात्रय बंडगर, ऍड खंडेराव चौरे, धनंजय शिंगाडे, संतोष हंबीरे, लक्ष्मण माने,पांडुरंग लाटे,सोमनाथ गुरव, पांडुरंग कुंभार,इंद्रजीत देवकते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते