बायोमायनिंगच्या खतापासुन धाराशिव नगर परिषदेचा उद्यान विकास घोटाळ्याचा पॅटर्न ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचा उद्यान विकास घोटाळ्याचा एक पॅटर्न सध्या जोरदार चर्चेत आहे. नगर परिषदेने तब्बल 2 कोटी 22 लाख रुपये घनकचरापासुन खत केले व ते खत नगर परिषदेच्या उद्यानात टाकले असा दावा विधीमंडळ तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केला आहे. खत निर्मिती न करता ठेकेदार याला बिले दिल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. विधिमंडळात चुकीचे उत्तर दिल्याचेही त्यांचे म्हणणे असुन त्याबाबत हक्कभंग व इतर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या घोटाळ्याचा केंद्र बिंदू समोर येणे गरजेचे आहे. जवळपास 52 हजार 440 घन मीटर कचऱ्याचे खत करण्यात आले त्यानंतर ते पालिकेच्या उद्यानात टाकण्यात आले असा दावा आहे.
नगर परिषदेच्या सर्व्हे नंबर 348 मधील कचरा डेपो येथे साठलेल्या कचऱ्याचे खत तयार करण्याचे काम करण्यात आले. प्रत्यक्षात 2 लाख 34 हजार 190 घन मीटर कचरा होता मात्र त्यापैकी केवळ 52 हजार 440 घन मीटर काम केले व उर्वरित 1 लाख 81 हजार 750 घन मीटर कचरा शिल्लक राहिला. 2 कोटी 22 लाख प्रकल्प पुर्ण झाल्यावर त्याला काम पुर्ण झाल्याचा दाखला काही कर्मचारी यांना केंद्र स्थानी ठेवून आर्थिक व्यवहारातून केला आला. तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, नगर अभियंता नवनाथ केंद्रे यांच्या कार्यकाळात हे काम करण्यात आले.
बायोमायनिंग (घनकचरा विलगीकरण व प्रक्रिया ) प्रकरणाची नगर परिषदेतील संचिका / अभिलेखे तपासून त्याचा स्वयंस्पष्ट अहवाल आवश्यक त्या कागदपत्रासह 2 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांना दिले आहेत.
या प्रकरणाची चौकशी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे मार्फत करण्यात येणार आहे. शहरात उद्याने किती, कोणत्या उद्यानात खत टाकले आणि टाकले तर ती उद्याने बहरली नाही का ? की खतच असे निकृष्ट दर्जाचे होते त्यामुळे बहरलेली उद्याने भकास झाली ? हे प्रश्न आहेत.