बलात्कार प्रकरणामध्ये धाराशिव शहरातील एका आरोपीला 10 वर्ष सक्त मजुरीची व दंडाची शिक्षा
धाराशिव – समय सारथी
बलात्कार प्रकरणामध्ये धाराशिव शहरातील एका आरोपीला 10 वर्ष सक्त मजुरीची व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादीने 10 एप्रिल 2017 रोजी धाराशिव शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे साबेरोद्यीन उर्फ साबेर जियाउद्यीन शेख वय 38 वर्षे याने रात्री 8.30 च्या सुमारास फिर्यादीच्या घरात घुसून तिचेवर जबरदस्तीने बलात्कार केला व त्यावेळी फिर्यादी नकार देत असताना आरोपीने फिर्यादीस मारहाण केली व चाकुचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला त्यावरून फिर्यादीने पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे फिर्याद दाखल केल्यावरून आरोपी याचेविरूध्द कलम 376,452,323,506 अन्वये गुन्हा दाखल होवुन तपासणी अधिकारी एस.बी.तांबे सहायक पोलीस निरीक्षक यांनी तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणामध्ये एकुण 7 साक्षीदारांचा पुरावा न्यायालयामध्ये नोंदविण्यात आला. सदर खटल्यामधील आरोपीविरुध्द फिर्याद जरी अनोळखी इसमाविरूध्द दिलेली असली तरी फिर्यादीने आरोपीस न्यायालयात ओळखले. तसेच प्रकरणामध्ये आलेला एकुण पुरावा या सर्व बाबी न्यायालयामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने सिध्द झाल्यामुळे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही जी मोहीते यांनी आरोपीस कलम 376 भादविमध्ये 10 वर्षे सक्तमजुरी व 13 हजार दंड आणि कलम 452 भादवि अन्वये 3 वर्षे शिक्षा व 1 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास आणि कलम 323 भादवि अन्वये 1 हजार दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने शरद जाधवर, जिल्हा सरकारी अभियोक्ता व जयंत व्ही. देशमुख यांनी कामकाज पाहिले.