प्रशासनाचा तुघलकी कारभार, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तर शेतकऱ्यांचे मरण
उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 401 शेतकरी गोगलगायने बाधित, अवघ्या 19 लाखांची मदत
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाचा तुघलकी कारभार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे, जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत शंखी गोगलगायमुळे केवळ 401 शेतकऱ्यांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाने पाठविला आहे त्यानुसार जिल्ह्याला फक्त 19 लाख 30 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उमरगा तालुक्यातील काही गावांचा दौरा करीत गोगलगायीने झालेल्या नुकसानीची आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत पाहणी केली होती त्यावेळी प्रशासकीय अधिकारी हजर होते मात्र त्यांना नुकसान दिसले नाही असेच म्हणावे लागेल. दरम्यान हे 401 शेतकरी कोणत्या भागातील आहेत त्याची गावे कळू शकली नाहीत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावात शेतीच्या शेती गोगलगायने उध्वस्त केल्या असताना पंचनामे नेमके कुठले केले हा प्रश्न विचारला जात आहे. नुकसानीची पाहणी करत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना भरीव मदतीचे आश्वासन दिले मात्र लोकप्रतिनिधीसह बाधित शेतकऱ्यांना प्रशासनाने मुर्खात काढले असेच या आकडेवारीवरुन म्हणावे लागेल. सत्ताधारी मंत्री, आमदार इतकेच विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी तितकेच जबाबदार असे म्हणवे लागेल, शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर कोण आवाज उठवतो हे पाहावे लागेल.
लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष व प्रशासकीय वचक न राहिल्याने अशी आकडेवारी देण्याची हिम्मत झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास 725 पेक्षा जास्त महसूली गावे आहेत त्यातील प्रत्येक गावात एक जरी शेतकरी 33 टक्के पेक्षा जास्त बाधित झाल्याचे गृहीत धरले तरी ही आकडेवारी काही हजाराच्या पुढे गेली असती मात्र ती कमी दाखवण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानली.
उस्मानाबाद जिल्हा शेजारील लातूर जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 636 शेतकरी गोगलगायने बाधित झाले असून 68 हजार 384 हेक्टर जिरायत क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल लातूर जिल्हाधिकारी व प्रशासनाने पाठविला त्यामुळे त्यांना जवळपास 52 कोटी रुपये नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे, लातूर शेजारी उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावे आहेत, लातूर प्रशासनाला गोगलगायीने झाल्याचे नुकसान दिसलें मात्र उस्मानाबाद प्रशासनाला दिसले नाही की त्यांनी सोंग घेत शेतकऱ्यांचे नुकसान केले हा प्रश्न विचारला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी हा एकीकडे नैसर्गिक अस्मानी संकटाने पिचलेला असताना प्रशासनरुपी सुलतानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. शेतकऱ्यांचे सरकार अशी घोषणा देत सत्तापरिवर्तन झाले मात्र त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय हे दिसत आहे.
दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे गोगलगायीमुळे नुकसान झाले आहे मात्र ते 33 % पेक्षा जास्त झाले नसल्याची भूमिका मांडली जात आहे. हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखा आहे.