पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा पुन्हा पाहणी व आढावा दौरा
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे उद्या सोमवारी 26 एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दरम्यान ते खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीसह कोरोना स्तिथीचा आढावा व काही ठिकाणी भेटी देणार आहे .
26 एप्रिल रोजी गडाख हे सकाळी 9.30 वाजता अहमदनगर येथून भूम येथे ग्रामीण रुग्णालयास भेट देतील व त्यानंतर गोलेगाव येथील कोविड केअर सेंटरला भेट देणार आहेत .11.30 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेऊन दुपारी 1 वाजता कोविड बाबत आढावा बैठक घेतील त्यानंतर 1.40 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड कक्षास भेट व त्यानंतर 2 वाजता जिजामाता जिजाऊ मुलींचे वसतिगृह येथे तपासणी कक्षास भेट देतील..
पालकमंत्री याचा गेल्या 8 दिवसातील हा दुसरा उस्मानाबाद जिल्हा दौरा असून मागील दौऱ्यात पालकमंत्री गडाख यांनी कोरोना अनुषंगाने अनेक बाबींचा आढावा घेतला होता व त्यात सापडलेल्या त्रुटी दुरुस्तीचे आदेश दिले होते त्यानुसार अनेक बाबतीत सुधारणा झाली आहे मात्र काही मूळ प्रश्न बाकी आहेत. प्रशासनात अनेक आघाड्यावर सुसूत्रता व समन्वय साधला जात असल्याने रेमडीसीवीर इंजेक्शन पुरवठा , रखडलेला ऑक्सिजन प्लान्ट व ऑक्सिजन पुरवठा यासारखे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागले आहेत तर लोकप्रतिनिधी यांनी कोविड केअर सेंटर सुरू करून प्रशासनाला हातभार लावला आहे. उस्मानाबाद येथे सामाजिक संस्था व देणगीदार यांच्या पुढाकाराने आणखी एखादी लॅब किंवा इतर आवश्यक मोठे युनिट उभा राहू शकते त्यासाठी नियोजनाची व पुढाकाराची गरज आहे.
शासकीय आकडेवारी व प्रत्यक्ष स्तिथी यात बराच वेळेस तफावत असते असा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे औषध पुरवठा, लसीकरण मोहीम , माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंमलबजावणी, माझे गाव कोरोनामुक्त गाव, डॉक्टर व इतर अपुऱ्या मनुष्यबळ , डेथ ऑडिट , सारीचे थैमानसह अन्य प्रश्नावर या दौऱ्यात चर्चा अपेक्षित आहे.