पंचनामा पूर्ण – उत्खनन झालेच नाही,अहवालासह दोषीवरील कारवाईकडे लक्ष
सुलतानी कारभार – शेतकऱ्याच्या नावावर तब्बल 40 कोटी रुपयांचा बोजा प्रकरण
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील एका शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर चक्क 40 कोटींचा बोजा लावण्यात आला आहे. गौण खनिजाचे उत्खनन केल्याचा ठपका ठेवत कळंब तहसीलदाराने कळंब तालुक्यातील मस्सा येथील जोतिराम वरपे या शेतकर्यांच्या सातबारावर 40 कोटीचा बोजा चढवला होता, या प्रकरणी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सोमवारी पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वरपे यांच्या शेतात उत्खनन झाले नसल्याचे आढळून आले असून तसा पंचनामा पंचच्या स्वाक्षरीने केला आहे त्यामुळे आता या प्रकरणात अहवालाकडे लक्ष लागले आहे तर चुकीचा बोजा नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वरपे यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शेगाव ते पंढरपूर हा महत्वकांक्षी प्रकल्प कळंब तालुक्यातून जातो. मेघा कंस्ट्रक्शन ही कंपनी या रस्त्याचे काम करते .या कामासाठी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले. या कंपनीने उत्खनन केलेल्या गौण खनिजाची शासनाकडे रॉयल्टी भरली नाही. हे लक्षात आल्यावर कळंब तहसीलने यासंदर्भात 40 कोटीचा दंड ठोठावला मात्र हा दंड कंपनीला न आकारता याचा बोजा शेतकऱ्याच्या सात-बारावर चढवला आहे. प्रत्यक्षात मात्र वरपे यांच्या शेतात कोणतही गौण खनिजाचे उत्खनन झालंच नाही. कळंब तहसीलच्या या सुलतानी कारभारामुळे हा शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
वरपे हे शेतकरी आपल्या शेतात ठिबक सिंचनाची योजना राबवण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या सातबाऱ्यावर 40 कोटीचा बोजा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. उत्खनन न करताच सातबाऱ्यावर 40 कोटीचा बोजा असल्याचे ऐकून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. हा बोजा तात्काळ कमी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी वरपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
रस्त्याच्या बांधकामासाठी मेघा कन्स्ट्रक्शन या कंपनीने गौण खनिजाचे उत्खनन केले. ज्या ठिकाणी उत्खनन झाले तो शेतकरी व कंपनीला दंड ठोठावणे अपेक्षित होते मात्र हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे असाच म्हणावा लागेल.