विरोध व पाठिंबा कोणाचा ? ओबीसी आरक्षणाचा पेटता मुद्दा तर कोरोनाचे सावट
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासह नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीची मुदत येत्या 2 महिन्यात संपत असुन या निवडणुकीसाठी प्रभाग की वॉर्ड रचना ? याची चर्चा व त्यानंतर फैसला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रभाग रचना रद्द करून वॉर्ड पद्धत निवडणुक आयोगाने जाहीर केली असली तरी यावर महाविकास आघाडीतील पक्षात वेगवेगळे मत प्रवाह आहेत. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तरी तो निर्णय किंवा शिफारस निवडणुक आयोग मान्य करणार का ? यावर मतमतांतरे आहेत तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने मोठी व्होट बँक नाराज आहे त्यामुळे त्यांची मनधरणी करणे एक आव्हान ठरणार आहे. महाविकास आघाडी की बिघाडी बरोबरच वेगवेगळ्या स्थानिक विकास आघाडीमुळे आगामी काळात राज्यातील वातावरण पेटणार असले तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट कायम आहे.
नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळात मुदत संपणाऱ्या नगर परिषदच्या निवडणूकसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे लेखी आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. उस्मानाबादसह राज्यातील 150 नगर परिषद व नगर पंचायतचा प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक असणार आहे आता जनतेतून नव्हे तर विजयी नगरसेवक उमेदवारामधुन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड व प्रभाग यावर मतभेद आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे , निवडणूक संचालन नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असून नगर परिषद अधिनियम 1965 चे कलम 41(1) नुसार मुदतपूर्व निवडणूक घेणे गरजेचे आहे त्यानुसार तयारी सुरू आहे यात प्रत्येक प्रभागात 1 सदस्य रचना तयार करण्यात येणार असून प्रभाग तयार करताना 2011 ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. कच्चा आराखडा तयार करण्यासाठी 2011 ची लोकसंख्या , नकाशे विचारात घेतले जाणार आहेत.प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या अंतीम करण्यात येणार असून वाढीव शहर हद्द व इतर भाग यात समाविष्ट केला जाणार आहे.