धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानीचे पंचनामे केवळ ‘अतिवृष्टी’चे निकष लावून न करता, सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
खासदार राजेनिंबाळकर यांनी आमदार कैलास पाटील यांच्यासह राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. “शासकीय निकषानुसार ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी मानली जाते, मात्र अनेक मंडळांमध्ये सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही नुकसानग्रस्त गृहीत धरून मदत देणे अत्यंत आवश्यक आहे,” असे खा. राजेनिंबाळकर यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
हेक्टरी 13 हजार 500 रुपयांच्या मदतीची मागणी
निवडणुकीपूर्वी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13 हजार 500 रुपयांप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली होती, त्याच धर्तीवर आताही तातडीने मदत मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील 78 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असून, जिल्ह्यातील 30 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मात्र, इतर मंडळांमध्येही सोयाबीन, उडीद, मूग, तूर यांसारख्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जमिनी खरवडून गेल्या, जनावरे वाहून गेली
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठे पूर आले आहेत. या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या जमिनी खरवडून गेल्या असून शेतातील सुपीक माती वाहून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांची जनावरेही पुरात वाहून गेल्याने त्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट झाले आहे. या सर्व गंभीर परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती खासदार राजेनिंबाळकर आणि आमदार पाटील यांनी केली आहे.