धुडगुस, तोडफोड, मारहाण – वाशी तालुक्यातील शेलगाव येथे पवनचक्की साईटवर दहशत, पोलिसात गुन्हा नोंद
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील शेलगाव येथे एका पवनचक्की कंपनीच्या साईटवर 10-15 गावगुंडानी धुडघूस घालत तेथील वाहने, कार्यालयाची तोडफोड करीत कामगार व स्थानिक नागरिकांना बेदम मारहाण केली. मागील काही दिवसापूर्वीही असाच प्रकार घडला होता त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडल्याने या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाण प्रकरणी अखेर वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात कलम 324,427,143,147 सह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मागील काही दिवसात लोहारा,उमरगा,भुम,परंडा वाशी या भागात पवनचक्की माफियाचा धुडगुस सुरु असुन याला राजकीय पाठबळ मिळत असल्याने आरोप प्रत्यारोपावरून राजकारण सुद्धा तापले आहे, असे असतानाच या भागात पुन्हा एकदा पवनचक्की साईटवर मारहाण व गोंधळ घातल्याची घटना घडली आहे त्यामुळे या अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
कधी पवनचक्की मालकांकडून पैसे मागणे तर कधी त्यांना प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळणे, शेतकऱ्यांना धमकावणे असे प्रकार सुरु आहेत.
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफिया दिवसेंदिवस वाढला असुन याकडे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.