खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी ट्विट करून दिले प्रतिउत्तर
उस्मानाबाद – समय सारथी
धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र आहे त्यापासुन फक्त कौरवांना धोका , राज्यात तर 105 कौरव आहेत त्याला फक्त धनुष्यबाणच रोखणार असे ट्विट शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी केले आहे. भाजप आमदार यांना कैलास पाटील यांनी कौरवांची उपमा दिली असून त्याला शिवसेनेचा धनुष्यबाणच रोखणार असे सांगत हल्लाबोल केला आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीका केल्यानंतर आमदार पाटील यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर राज्यभरात भाजप शिवसेना वाद पेटला असून आरोप प्रत्यारोप होत आहेत.जगाला तालिबान पासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाण पासून खरा धोका आहे असे ट्विट भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध ट्विट करून केला आहे त्या ट्विटला शिवसेनेने उत्तर दिले आहे.
या ट्विटरनंतर शिवसेना व भाजप समर्थकांत चांगलीच जुंपली आहे. शिवसैनिकांनी भाजप आमदार पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला गमजा व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर झालेल्या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. धनुष्यबाणापासून धोका होता म्हणणारे निवडणुकीत धनुष्यबाण घालून मतांची भीक मागत होते अन मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश द्यावा म्हणून 4 वेळा लोटांगण घेत होते. काय वेळ आली तुमच्यावर पार सतरंज्या उचलाव्या लागत आहेत फडणवीसांच्यासह तिकिटासाठी मातोश्रीवर जाणाऱ्यानी धनुष्यबाणवर बोलू नये अशी टीका शिवसैनिकांनी भाजप आमदार पाटील यांच्यावर केली आहे.