धाराशिव – समय सारथी
विविध कारणाने वादग्रस्त ठरलेल्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा असा अहवाल वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम थोरात यांनी दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. वारंवार नियमांचा भंग होत असल्याने कायदा सुव्यवस्था व इतर कारणे नमूद करीत पोलिसांनी हा अहवाल तहसीलदार प्रकाश म्हत्रे यांच्याकडे सादर केला असुन त्यावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे पाहावे लागले. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने कला केंद्र व तेथील गैरप्रकार समोर आणला पाठपुरावा करीत आहे.
वाशी तहसीलदार प्रकाश म्हत्रे यांनी 17 जुन 2025 रोजी या कलाकेंद्राचा परवाना निलंबित केला होता मात्र त्याला स्थागिती देण्याचे ‘दिव्य’ काम जिल्हाधिकारी कार्यालयाने केले होते. आता पोलिसांनी ठोस कारणे नमुद करीत अहवाल दिला आहे. कला केंद्रावर झालेल्या हाणामारीच्या घटना व गुन्हे, पुजा गायकवाड हिचा व आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ, दारू विक्री, रात्री उशिरा सुरु असणे, डीजेचा सर्रास वापर, स्थानिक महिला व ग्रामस्थाचा विरोध, विविध संघटना यांच्या तक्रारी, कला केंद्रात महिला नर्तकी यांची झालेली छेडछाड व त्या असुरक्षित असणे यासह अन्य कारणे व कागदपत्रांची जंत्री अहवालासोबत जमा केली आहे.
महाकाली केंद्रात 2 गटात वाद झाला त्यातून जीवघेणा हल्ला झाला होता. महाकाली कला केंद्रातील सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि निता जाधव या 3 नर्तकी महिला उमरगा येथील अभिषेक कालिदास शिंदे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाच्या हत्येत आरोपी असुन पोलिसांनी अटक केली आहे. याठिकाणी सुद्धा अनेक घटना घडल्या असुन त्यावर प्रशासन काय कारवाई व निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्राचा विषय ऐरणीवर आला होता. पुजा ही नर्तकी तुळजाई कला केंद्रात होती, तिथे त्या दोघांचे प्रेम बहरले व वाद टोकाला गेला. आत्महत्यापुर्वी बर्गे हे पुजाला भेटायला तुळजाई कला केंद्रावर आले होते त्यावेळी तिने नकार दिला, वाद झाला आणि बर्गे यांनी तिथून पुजाच्या घरी आईकडे जाऊन आत्महत्या केली. पुजा व बर्गे यांच्यात संबंध असल्याचे व इतर पुरावे पोलिसांना तपासात मिळाले आहेत. तुळजाई कला केंद्रातील काही जणांची पोलिसांनी चौकशी सुद्धा केली आहे.
तुळजाई, अंबिका, महाकाली, कालिका अशी देवी देवतांची नावे देऊन अनेकांच्या भावना दुखवल्या आहेत. कला केंद्र मालकांनी देवांच्या नावा ऐवजी स्वतःचे, मुलाबाळांचे नाव देऊन त्यांचे नाव अजरामर करावे मात्र लोकांचे संसार उध्वस्त करून कुटुंब मोडू नये अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे.