तेरणा कारखाना भैरवनाथ समूहाला देण्याचे आदेश – मंत्री सावंत यांना दिलासा, 21 शुगर समूहाची याचिका फेटाळली
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे DRAT (कर्ज वसुली न्यायाधिकरण) कोर्टाने आदेश दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा बँकेनी टेंडर प्रक्रिया राबवलेली ती योग्य असल्याचे आदेश दिले आहेत.माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली आहे. भैरवनाथ समूहाला आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग या आदेशामुळे मोकळा झाला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची कारवाई झाली होती मात्र माजी मंत्री अमित देशमुख यांच्या समूहाने कोर्टात याचिका दाखल केली होती. तब्बल एक वर्षाच्या न्यायलयीन लढाई नंतर तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाला मिळणार आहे त्यासाठी जिल्हा बँकेने पुढील प्रक्रिया तात्काळ राबविणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 6 डिसेंबर 202 रोजी जिल्हा बँक,अवसायक व भैरवनाथ शुगर यांच्यामध्ये तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योगसमूहला 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली मात्र त्यानंतर भाडेतत्वावरच्या निविदा प्रक्रियावर शंका घेत ट्वेंटीवन शुगरने न्यायालयात धाव घेतली. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला भविष्य निर्वाह निधीचे सील असून जीएसटी वस्तू व सेवा कर,महावितरण, राज्य उत्पादन शुल्क या विभागाची थकबाकी आहे.
राजकारणात तेरणा कारखान्याचा दबदबा –
तेरणा कारखान्याचे जवळपास 120 खेडेगावात 32 हजारच्यावर सभासद असुन उस्मानाबाद व शेजारील लातूर जिल्ह्यात संपर्क आहे. दीड हजार कामगार यांना रोजगार मिळणार असुन यामुळे या भागातील आर्थिक गणित बदलणार आहे. तेरणा ज्याच्या ताब्यात त्याकडे आमदारकी व इतर राजकीय सत्ता राहते हे आजवरचे गणित राहिले आहे. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघात तेरणा कारखाना केंद्रबिंदू असतो त्यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार आहेत
असा आहे भाडेकरार, जिल्हा बँकेला होणार फायदा –
तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याची पाच हजार मेट्रीक टन इतकी गाळप क्षमता व देशी दारुचे उत्पादन तसेच वीज निर्मीतीचा 14 मेगावॅटचा प्रकल्पचा समावेश आहे. भाडेतत्वावर देताना हा कारखाना 25 वर्ष करारावर देण्यात येणार आहे,यामध्ये पहिल्या चार वर्षी दोन कोटी रुपये,तर पाच ते करारसंपेपर्यंत सहा कोटी रुपये वार्षिक भाडे स्विकारले जाणार आहे.शिवाय भाड्यापोटी प्रतिमेट्रीक टन गाळपावर पहिले तीन वर्ष प्रति लिटर 73 रुपये, चौथ्या वर्षापासुन करार संपेपर्यंत 81 रुपयाप्रमाणे दिले जाणार आहे.
डिस्टलरी पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये, दोन वर्ष दोन रुपये व पाचव्या वर्षीपासुन चार रुपये करार संपेपर्यंत असणार आहे. देशी दारुवर पहिले दोन वर्ष प्रतिलिटर एक रुपये,दोन वर्ष दोन रुपये पाचव्या वर्षापासुन तीन रुपये आकारले जाणार आहे.
वीजनिर्मीती प्रकल्पाच्या उत्पादनावर पहिले चार वर्ष दोन टक्के तर पाचव्या वर्षापासुन करार संपेपर्यंत तीन टक्के रक्कम आकारण्यात येणार आहेत.या भाडेकरारात कारखान्याची 105 हेक्टर 41 आर इतकी जमीन देखील मिळणार आहे.