तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून छत्रपती संभाजीराजे यांना अडविले – नियमांचा फटका
महाराजांचा अवमान, माफी मागून कारवाई करा अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा
उस्मानाबाद – समय सारथी
छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून चुकीची वागणूक देत गैरवर्तन केल्याचा करीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी यांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी अडव ल्याने स्वतः संभाजी महाराज यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे तर महाराज यांचे समर्थक व सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल संध्याकाळी 9 वाजताच्या दरम्यान संभाजीराजे छत्रपती दर्शनासाठी आले असता त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडविले गेले. गेली काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी ज्या पूजाऱ्याची पाळी आहे ते वगळता सर्वांना मंदिर गाभरा प्रवेश बंदी केली आहे या नियमाचा आधार घेत संभाजी महाराज यांना अडविण्यात आले, या नियमाचा फटका संभाजी राजे यांना सुद्धा बसला.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी असल्याने छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील तुळजाभवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. काल संध्याकाळी 9 वाजता दरम्यान युवराज संभाजीराजे छत्रपती आले होते यावेळी मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून प्रतिबंध केला गेला. सरकारी नियम दाखवत महाराजांना मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले. राजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी विनंती करून देखील त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला गेला नाही.मंदिरातीळ कंत्राटी पध्दतीने कामावर असलेल्या अन मंदिर प्रशासनातील कर्मचारी यांनी गैरवर्तन केले असा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे.या प्रकरणी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध व्यक्त केला आहे, या प्रकरणातील संबंधित मंदिर तहसीलदार, व्यवस्थापक आणि धार्मिक व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी निलंबन करावे अन्यथा राज्यभर जनआंदोलन उभारू अशी उद्विग्न भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
छत्रपती संभाजीराजे तुळजाभवानी मातेच्या दर्शनास दरवर्षी न चुकता येत असतात, तेव्हा ते परंपरेनुसार गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतात. यावेळी छत्रपतींच्या पुजाऱ्यांतर्फे आरती केली जाते. चार महिन्यांपूर्वी संभाजीराजे दर्शनास आले असता, त्यांनी गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतले होते. तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. छत्रपती संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले मात्र छत्रपती घराण्याच्या पूर्वापार प्रथा परंपरा आजही इथे पाळल्या जातात. दररोज भवानी मातेला पहिला नैवेद्य व अभिषेक हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा असतो. भवानी माता निद्रा घेते तो पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती महाराज अर्पण करतात. त्याच पलंगावर भवानी माता निद्रा घेते. मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती घराण्याने शेकडो एकर जमीन दान दिली आहे असे असतानाही त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले.
तुळजापूर हा भाग पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असताना सुद्धा भवानी माता छत्रपती घराण्याची कुलदेवता असल्यामुळे निजामाने देखील कधीही इथे हस्तक्षेप केला नाही. ब्रिटिशांच्या काळात देखील ब्रिटिशांनी कधीही इथे हस्तक्षेप केला नाही किंवा कोणते नियम छत्रपती घराण्यावर लादले नाहीत.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व तुळजापूर तहसीलदार व्यवस्थापक यांनी गाभाऱ्यात जाण्यास बंदी करणे हा नियम जरी योग्य असला तरी छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे होते असे मत व विचार प्रवाह यानिमित्ताने समोर आला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही, ही परंपरा आहे. निजामाने आणि इंग्रजानी देखील या परंपरामध्ये हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही त्या परंपरा हे सरकार व प्रशासन मोडू पाहत आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला.
तुळजाई नगरीत देवीच्या दारात वाद नकोत म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी जरी शांततेने हे प्रकरण हाताळले असले तरी सरकारने समस्त महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचा हा अपमान केला आहे. सरकारने आणि प्रशासनाने समस्त महाराष्ट्र वासियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल माफी मागावी आणि हा प्रकार पुन्हा घडू नये याची हमी द्यावी अशी उद्विग्न भावना यावेळी पत्रकार परिषदेत मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.