तुळजापूर व धाराशिव नगर परिषदेतील नौकर भरती घोटाळ्यावर शिक्कामोर्तब – चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल
निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांच्या काळात दोन्ही ठिकाणी भरती
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर व धाराशिव नगर परिषदेत नौकर भरती करताना नियमांचे उल्लंघन झाले असुन शैक्षणिक अहर्ता नसताना नौकर भरती केल्याचा ठपका त्रीसदस्य समितीनेचौकशी अहवालात ठेवला असुन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे संपूर्द केला आहे.नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. तुळजापूर येथे 9 तर धाराशिव येथे 3 अशी 12 पदे भरली गेली आहेत.
विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी या घोटाळ्याची तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली. धाराशिव व तुळजापूर या दोन्ही नगर परिषदेतील नौकरभरती प्रक्रिया ही तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांच्या काळात झाली होती.
धाराशिव मुख्याधिकारी असताना यलगट्टे यांनी राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी भरती केली नाही मात्र प्रशासक म्हणून दोन्ही अधिकार प्राप्त झाल्यावर त्यांनी वाटा शोधत भरती केली तर तुळजापूर येथे मुख्याधिकारी पदभार मिळताच नौकर भरती केली. या घोटाळ्याने यलगट्टे यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.
तुळजापूर व धाराशिव नगर परिषदेत नौकर भरती अनुकंपा भरतीमध्ये सरळ सेवेचे 20 टक्के पदे भरण्याची मर्यादा असताना उल्लंघन करुन 50 टक्के पदे भरण्यात आली तर मंजुर आकृतीबंधामध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अहर्ताचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवला आहे.
यलगट्टे यांच्यावर यापूर्वी भंगारचोरी, अट्रॉसिटी व बांधकाम परवाना प्रकरणात गुन्हे नोंद झाले असुन त्यांना जेलवारी सुद्धा झाली आहे. विधिमंडळात हक्कभंग, संपत्तीची लाचलुचपत विभागाकडुन चौकशी यासह यलगट्टे यांच्या काही प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच नौकर भरतीचा अहवाल धडकला असुन त्यात नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हणटले आहे त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान धाराशिव नगर परिषदेतील गुंठेवारी प्रकरणातील चौकशी सुरु असुन अहवाल 31 मे पर्यंत सादर करायचा होता मात्र त्याला दिरंगाई होत आहे.