डॉ शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला – रूग्णांची फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा
आता तरी पोलिस डॉ शेंडगे यांना अटक करणार का ? 15 दिवसांपासुन डॉ शेंडगे फरार
उस्मानाबाद – समय सारथी
उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे संचालक डॉ आर डी शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. तीन सदस्यच्या समितीसमोर आलेले डॉक्टरचे हस्ताक्षर आणि डॉक्टर यांनी बनसोडे यांच्याकडे दिलेल्या कागदावर असलेले हस्ताक्षर यात तफावत दिसून आली . डॉ शेंडगे यांनी किती कोटी रुपयांचा घोटाळा केला ? किती व कोण कोणत्या विमा कंपन्याकडून फायदा करून घेतला यासह अन्य कारणास्तव डॉ आर डी शेंडगे यांची अटकपूर्व जामीन अर्ज उमरगा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी के अनभुले यांनी २६ आक्टोबर रोजी फेटाळला असल्याची माहिती सरकारी वकील संदीप देशपांडे यांनी दिली.
डॉ शेंडगे हे गुन्हा दाखल झाल्यापासुन 12 ऑक्टोबरपासुन फरार आहेत. फरार डॉ शेंडगे व त्यांचा सहायक बनसोडे हे सापडत नसल्याने पोलीस यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्या नंतर तरी शेंडगे व बनसोडे यांना अटक होणार का ? हे पाहावे लागेल.
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याचे प्रकरण चौकशी समितीत उघड झाल्यानंतर डॉ आर डी शेंडगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला तेव्हा पासून ते फरार आहेत, त्यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता तो आता फेटाळून लावला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून रुग्णांची आर्थिक फसवणुक केल्या प्रकरणी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांच्यासह तत्कालीन लॅब टेक्निशियन तानाजी बनसोडे विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सहायक पोलिस निरीक्षक गोरे करीत आहेत.विशेष म्हणजे या प्रकरणात बनसोडे याने डॉ शेंडगे यांच्या कृत्याचा भांडाफोड करीत पुराव्यासह लेखी तक्रार केली होती त्यात चौकशी समितीत तथ्य सापडल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले
डॉ शेंडगे हे करीत असल्याच्या कृत्याचा फटका जेव्हा बनसोडेला बसला तेव्हा त्याने तक्रार केली. डॉ शेंडगे यांनी बनसोडे आजारी नसताना आजारी असल्याचे कागदोपत्री दाखवून त्याच्या नावाने विमा कंपनीकडुन वैद्यकीय बिल उचलले त्यानंतर बनसोडे व डॉ शेंडगे यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि सर्व भांडाफोड झाला.
डॉ शेंडगे हे रुग्णाचे नाव व कोडवर्डच्या खुणा चिट्ठीवर करून द्यायचे, एक बाण, दोन बाण , तीन बाण वरच्या बाजूला असल्यास सादर रुग्णाचे ब्लड रिपोर्ट अहवाल हे वाढवून द्यायचे व खाली बाण केलेला असल्यास त्याचे तपासणी निष्कर्ष कमी द्यायचे असे सांकेतिक भाषेत ठरले होते. प्लस चिन्ह लिहल्यास पॉझिटिव्ह व मायनस चिन्ह लिहल्यास निगेटिव्ह असे समजून तसे रिपोर्ट देण्यास मला भाग पाडत असत. या रुग्णालयाावर माझी उपजिवीका असल्याने मी हे रुग्णाचे खोटे अहवाल दिले असल्याचा कबुली जबाब बनसोडे यांनी तक्रारीत व चौकशी समितीसमोर दिला होता. हा चौकशी अहवाल डॉ आर यु सूर्यवंशी, डॉ सीमा बळे व डॉ रोचकरी यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिला होता.