शिवकालीन 71 नाणी हस्तगत नाहीत, मुख्य सुत्रधाराचा शोध सुरूच
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी यांना आज पुन्हा 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी तुळजापूर तालुका न्यायालयाने दिली आहे. यापूर्वी कोर्टाने नाईकवाडी यांना 2 वेगळेस 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्यांनतर आज तिसऱ्यांदा 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.या दोन्ही पोलीस कोठडीत नाईकवाडी यांनी पुरातन नाणी कुठे आहेत ? ती कोणाला दिली व त्याची विल्हेवाट कशी लावली ? या दरोड्यातील साथीदार कोण यांची नावे न सांगितल्याने वाढीव पोलीस कोठडी दिली आहे. एकंदरीत नाणी व इतर मुद्देमाल दिल्याशिवाय नाईकवाडी यांची सुटका होणार नसल्याचे दिसते दरम्यान या प्रकरणात तत्कालीन काही जिल्हाधिकारी यांच्यासह बड्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे यात पोलीस तपास यंत्रणावर मोठा दबाव आहे.
शिवकालीन व इतर राजेराजवाडे यांनी देवीला अर्पण केलेले 71 प्राचीन नाणे पैकी एकही नाणे नाईकवाडी यांच्याकडून जप्त न झाल्याने व तपासात नाईकवाडी यांच्यासोबत असलेल्या महत्वाच्या साथीदारांची नावे समोर आली नाहीत त्यामुळे आजची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.नाईकवाडी यांनी धार्मिक काम पाहिले मग नाणे कोणी चोरली ? हे अद्याप समोर आले नाही.
नाईकवाडी यांना 19 सप्टेंबर 2021ला अटक केलेल्यानंतर तुळजापूर तालुका कोर्टाने 26 सप्टेंबर पर्यंत 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ती संपल्याने त्यांना पुन्हा एक दिवसांची व त्यानंतर सोमवारी पुन्हा तिसऱ्यांदा 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजुम शेख करीत असुन त्या व सहायक पोलिस निरीक्षक शरद रोडगे हे करीत आहेत.
तुळजाभवानी देवीच्या पुरातन नाण्यावर डल्ला मारल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यापासून नाईकवाडी तब्बल 1 वर्ष फरार होता मात्र अखेर त्याला तुळजापूर पोलिसांनी अटक केली. नाईकवाडी यांनी 35 तोळे सोने , 71 किलो चांदी व 71 प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा नोंद होता. नाईकवाडी यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत त्यांनी टप्या टप्याने पुरातन नाणी गायब केली आहेत त्यामुळे या काळात त्यांना कोण मदत केली ? त्यांचे साथीदार व सूत्रधार कोण ? ही नाणी सध्या कुठे आहेत हे समोर आले नाही.
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी याबाबत लेखी तक्रार केली होती, त्यांनतर झालेल्या चौकशीत हा घोटाळा समोर आला.तुळजाभवानी मंदिर संस्थानचा धार्मिक व्यवस्थापकपदी दिलीप नाईकवाडी कार्यरत असताना 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत नाईकवाडी यांनी पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याचा ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 34 तोळे सोने व सुमारे 71 किलो चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली. या फिर्यादीवरुन 323 कलम 420, 464, 409, 467, 468, 471, 381 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला .
या 71 प्राचीन नाण्यासह अनेक दागिने गायब
तुळजाभवानी मातेला निझाम , औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती . या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते.
भेटवस्तु रुपी मलिदा खाल्ला कोणी
तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या अनेक महागड्या वस्तू , साड्या , चांदीच्या मूर्ती या तत्कालीन मंत्री , राजकारणी व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेट देऊन त्याची मेहेरनजर मिळविण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे ही नाणी नाईकवाडी यांनी गायब करण्यामागे खरा सूत्रधार समोर येणे गरजेचे आहे.